Ratnagiri Crime News: कोकणनगर येथे बंद घर फोडून २ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास

Ratnagiri Crime News: कोकणनगर येथे बंद घर फोडून २ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास

अज्ञात चोरट्याने खिडकीचे लॉक उचकटवून साधला डाव; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ratnagiri Crime News: रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील राधाकृष्ण नगर परिसरात घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. एका बंद घराचा कडी-कोयंडा आणि खिडकीचे लॉक उचकटवून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २० हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

बंद घराचा फायदा घेत साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, ही घरफोडी महेक अबरार हाज (वय ४०, रा. राधाकृष्ण नगर, कोकणनगर, ता. जि. रत्नागिरी) यांच्या राहत्या घरी झाली. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपासून ते २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादींचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हॉलच्या स्लायडिंग खिडकीचे लॉक हत्याराच्या साहाय्याने उचकटले आणि घरात प्रवेश केला.

बेडरूममधील पेटी तोडून रोख रक्कम लंपास
घरात घुसल्यानंतर चोरट्याने बेडरूममध्ये ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीची कडी व लॉक तोडले. पेटीत ठेवलेली २,२०,००० रुपये रोख रक्कम चोरून अज्ञात चोरटा पसार झाला. फिर्यादी महेक हाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.११ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणनगरसारख्या दाट वस्तीच्या परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Radhakrushna patapedhi