रत्नागिरी : मांडवी जेटी काळोखात

रत्नागिरी : शहरातील मांडवी जेटीला गेट वे ऑफ रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. पर्यटनाच्यादृष्टीने सर्वदूर परिचित असलेल्या मांडवी जेटी गेले काही दिवस सायंकाळी काळोखात आहे. दिवाळी सुट्टीमुळे हजारो पर्यटक दरदिवशी मांडवी जेटीला भेट देत आहेत. मात्र सायंकाळी त्यांची निराशा होत असून अनेकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहरात मांडवी, भाट्ये या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांसह स्थानिकांची पहिली पसंती असते. त्यात शहरवासीयांचे विरंगुळ्याचे मुख्य ठिकाण म्हणून मांडवी जेटी आणि किनाऱ्याची ओळख आहे. या ठिकाणी दरदिवशी शेकडो पर्यटक फिरण्यासाठी येतात. समुद्रामध्ये आतपर्यंत ही जेटी उभारलेली असल्यामुळे अनेकांसाठी आकर्षण ठरते, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा संध्याकाळीही फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जेटीवर येतात. रात्री उशिरापर्यंत फेरफटका मारणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. २०१७ पूर्वी जेटी पूर्ण झालेली होती. या जेटीची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती.

२०१७-१८ मध्ये जेटीच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. जेटीवर सुरक्षेसाठी रेलिंग, पर्यटकांना बसण्यासाठी वाकडी बसवण्यात आली. तसेच उत्तम प्रकारचे दिवे बसवले आहेत. रात्री रोषणाईमुळे मांडवी जेटी अधिक खुलून दिसते. वर्षभरापूर्वी काही माथेफिरूंनी त्या दिव्यांची तोडफोड केली होती. त्याची दुरुस्ती प्रशासनाने केली. त्यानंतर हे यंत्रणा व्यवस्थित सुरू होती. परंतू गेले काही दिवस पुन्हा जेटीवर काळोखाचे साम्राज्य पसरले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच हा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे लोकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासनाने गांभियनि पाहावे अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, ही जेटी मेरीटाईम बोर्डाकडे आहे. त्यामुळे तिथे होणारी कामे ही मेरीटाईम बोर्डामार्फतच होतात. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतीकरण देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडे वर्ग केली आहे. गेल्या वर्षभरात दुरुस्ती झाली आहे की नाही याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे. मांडवी जेटीवरील विजेचा प्रश्न गेले अनेक दिवस सुरु आहे. त्यावर वेळीच तोडगा काढला पाहिजे. सुहास ठाकूरदेसाई, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 11/Nov/2024