सावर्डे पोलिसांत गुन्हा दाखल; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
चिपळूण (रत्नागिरी): Mandki Khambewadi Burglary News समोर आली असून चिपळूण तालुक्यातील मांडकी खांबेवाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीप्रकरणी घरमालक रमेश काशिनाथ पवार यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
रमेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने संधी साधली. चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीच्या विविध वस्तू लंपास केल्या.
चोरीला गेलेल्या चांदीच्या ऐवजात चांदीचे ताट, पेल्या, चांदीच्या उंदराची मूर्ती, करंडा, दुर्वा माळ, निरंजन, जानवं, जास्वंदीचे फूल आणि मोदक यांसह इतर वस्तूंचा समावेश आहे. रोख १० हजार रुपये आणि चांदीचे दागिने असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे.














