Vatad Kavathewadi School Tree Naming Event: निसर्गाचे रक्षण करण्याची जाणीव निर्माण करणारा ‘झाडांचे बारसे’ उपक्रम अनुकरणीय – प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

वाटद कवठेवाडी शाळेत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण उद्देशाने वृक्षारोपण

खंडाळा (रत्नागिरी):
Vatad Kavathewadi School च्या वतीने पर्यावरण रक्षण आणि वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘झाडांचे बारसे’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय आणि गौरवास्पद असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले. मानवाच्या उत्क्रांतीपासून निसर्गाने माणसाला भरभरून दिले असून, त्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी खंडाळा परिसरातील रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत सोहळ्याने झाल्यानंतर ‘झाडांचे बारसे’ करत त्याच झाडांचे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. कोकणातील समृद्ध निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत पूरक असून, यासाठी पालक व ग्रामस्थांची उपस्थिती शाळा आणि समाजातील सुसंवाद दर्शवणारी आहे, असे गौरवोद्गार प्रा. ढवळ यांनी काढले. शाळेचे कामकाज, शिक्षकांची आत्मीयता आणि पालकांचा सक्रिय सहभाग पाहून त्यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक गजानन पाटील यांनी मार्गदर्शन करताना, झाड लावल्यानंतर ते वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांतून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सदस्या उषा सावंत यांनीही वाटद कवठेवाडी शाळा नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे नमूद करत उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्याकडे निवेदन सादर केले.

Shanti 3

कार्यक्रमात क्रीडा शिक्षक डॉ. राजेश जाधव, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी आपल्या मनोगतातून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच उत्कृष्ट वृक्षसंवर्धक म्हणून स्पर्धा ठरलेल्या विद्यार्थी व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य संजना माने, सरपंच अमित वाडकर, केंद्रप्रमुख मीनाक्षी मोहिते, अरुण मोर्ये, संजय शितप, उदय माने, राजेश सावंत, अरविंद महाकाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी वाटद ग्रामपंचायतीने रोपे उपलब्ध करून दिली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समिती अध्यक्ष अप्पा धनावडे, अध्यक्षा निकिता कुर्टे, भाऊ धनावडे, रमेश तांबटकर, उदय रहाटे, विलास बारगुडे, मारुती कुर्टे, विश्वनाथ शिर्के, सुजाता लोहार यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी मेहनत घेतली. मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे आणि शिक्षिका पुनम कुलकर्णी यांनी शिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.