रत्नागिरीत पोलिसांच्या ‘ऑलआऊट ऑपरेशन’दरम्यान मोठी कारवाई; ब्राऊन हेरॉईनच्या १२० पुड्यांसह राजापूरचा तरुण गजाआड!

रत्नागिरीत पोलिसांच्या ‘ऑलआऊट ऑपरेशन’दरम्यान मोठी कारवाई; ब्राऊन हेरॉईनच्या १२० पुड्यांसह राजापूरचा तरुण गजाआड!

जेलरोड नाक्यावर नाकाबंदीत १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष ‘ऑलआऊट ऑपरेशन’दरम्यान मध्यरात्री जेलरोड नाका येथे एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेला ‘ब्राऊन हेरॉईन’ (टर्की) हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) केलेल्या या धडक कारवाईत सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेलरोड नाक्यावर नाकाबंदीत सापडला आरोपी :

दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३२ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक जेलरोड नाका परिसरात ‘ऑलआऊट ऑपरेशन’ अंतर्गत कडक नाकाबंदी करत होते. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला संशयास्पदरीत्या थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला पोलिसांनी हटकले. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव नुफेरअली खालीद तांडेल (वय २१ वर्षे, रा. गाझी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असल्याचे समोर आले.

Shanti real estate 1

ब्राऊन हेरॉईनच्या १२० पुड्या आणि दुचाकी जप्त :

पोलिसांनी आरोपीची आणि त्याच्या वाहनाची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी तयार केलेल्या ब्राऊन हेरॉईनच्या छोट्या-छोट्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला:

६० हजार रुपयांचे ब्राऊन हेरॉईन : पारदर्शक पिशवीत भरलेला उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईन (टर्की) सदृश अंमली पदार्थ (निव्वळ वजन ४ ग्रॅम, पिशवीसह ६ ग्रॅम). प्रत्येकी ५०० रुपये किमतीच्या एकूण १२० पुड्या.

१ लाख रुपयांची दुचाकी : गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस मोपेड (क्र. MH 08 AY 2805).

५ हजार रुपयांचा मोबाईल : रिअलमी कंपनीचा नारझो ८० लाईट मॉडेलचा मोबाईल हँडसेट.

इतर साहित्य : पुड्या बांधण्यासाठी वापरलेले १२० कागदाचे तुकडे व २ रिकाम्या प्लास्टिक पिशव्या.

अशा प्रकारे एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच जप्त केला.

एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद :

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस हवालदार गणेश राजेंद्र सावंत (पोहेकॉ/३०६, वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी नुफेरअली तांडेल याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६ नुसार अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायदा (NDPS Act १९८५) चे कलम ८(क) आणि २१(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा अंमली पदार्थ त्याने कुठून आणला होता आणि तो रत्नागिरीत कोणाला पुरवणार होता, या दिशेने पोलीस कसून तपास करत आहेत.