Mahendra Thorve on Sunil Tatkare बाबत मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही रामदास कदमांची बाजू घेतली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सुनील तटकरे यांची चौकशी व्हावी, या कदमांच्या मागणीचे समर्थन करत आमदार थोरवे यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर थेट निशाणा साधताना म्हटले की, दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या महत्त्वाच्या चर्चांमध्ये सुनील तटकरे यांना कुठेही घेतले जात नव्हते. पवार कुटुंबातील अत्यंत विश्वासू नेते एकत्र बसून या विषयावर चर्चा करत होते. त्यानंतर अजितदादांचा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच हॉटेल सिटी इनमधून तटकरेंनी अनेक आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी संपर्क साधण्याचा आणि कॉल करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप थोरवेंनी केला आहे. मात्र, या प्रयत्नांत तटकरे यशस्वी झाले नाहीत, असेही थोरवे म्हणाले.
Mahendra Thorve on Sunil Tatkare: विलीनीकरण अन् चौकशीची मागणी

सुनील तटकरे सध्या विलीनीकरणाच्या विषयावर जे सांगत आहेत ते पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत थोरवेंनी खालील मुद्दे मांडले:
रोहित पवार यांनी या प्रकरणी जी शंका उपस्थित केली आहे, ती देखील खरी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी सुनील तटकरे यांची चौकशी झालीच पाहिजे, ही ठाम भूमिका थोरवेंनी व्यक्त केली.
तटकरेंचा पलटवार आणि कदमांना नोटीस देण्याचा इशारा
दुसऱ्या बाजूला, खासदार सुनील तटकरे यांनी रामदास कदम आणि महेंद्र थोरवे यांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून त्यांचा तीव्र निषेध केला आहे. “रामदास कदमांची मानसिक स्थिती ठीक नाही, त्यांनी ठाण्याऐवजी आग्र्याला जाऊन उपचार घ्यावेत,” असा टोला लगावत तटकरेंनी आपण बॅरिस्टर अंतुलेंचे पीए नव्हतो हे पुन्हा स्पष्ट केले.
तसेच आपण गेल्या ४० वर्षांपासून जनतेची सेवा करत असून शरद पवार व अजितदादांनी आपल्याला अनेक पदे दिली आहेत, असे सांगत विलीनीकरणाचा विषय आता संपलेला आहे असे तटकरेंनी स्पष्ट केले. रामदास कदमांच्या खालच्या पातळीवरील भाषेचा निषेध करत त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय तटकरेंनी कायम ठेवला आहे.













