मिऱ्या-नागपूर महामार्गावर साखरपा येथे उभ्या आयशर टेम्पोला एस.टी. बसची जोरदार धडक; चालक, वाहकासह प्रवासी जखमी!

मिऱ्या-नागपूर महामार्गावर साखरपा येथे उभ्या आयशर टेम्पोला एस.टी. बसची जोरदार धडक; चालक, वाहकासह प्रवासी जखमी!

पहाटे पावणेपाच वाजता आंबा घाटाच्या उतारावर घडला अपघात; एस.टी. चालकाविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवरूख (रत्नागिरी) : मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट परिसरात साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला टायर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला भरधाव एस.टी. बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेत एस.टी. बसचे चालक, वाहक आणि बसमधील प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात एस.टी. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टायर पंक्चर झाल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला धडक :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र बोभाटे (वय ५२ वर्षे, रा. मु.पो. तोंडवली बोभाटेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हे त्यांचा आयशर टेम्पो (क्र. MH 07 AJ 6558) घेऊन गोव्याच्या दिशेने जात होते. पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर त्यांच्या टेम्पोच्या डाव्या बाजूचा पुढील टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांनी टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला सर्व इंडिकेटर चालू ठेवून सुरक्षितपणे उभा केला होता.

Lok. Tilak hospi.

उतारावर बसचा वेग न आवरल्याने घडला अपघात :

त्याच वेळी धाराशिव येथून लांजाकडे जाणारी एस.टी. बस (क्र. MH 14 MH 4835) त्या मार्गावरून येत होती. आरोपी बस चालक जितेंद्र संभाजी पाटील (वय ४१ वर्षे, सध्या रा. लांजा माउलीनगर, जि. रत्नागिरी; मूळ रा. कुर्ली, ता. चिकोडी, जि. बेळगाव) याने उताराच्या रस्त्यावर बस भरधाव वेगात, हयगयीने व धोकादायक पद्धतीने चालवून रस्त्याच्या कडेला इंडिकेटर चालू ठेवून उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.

चालक, वाहक व प्रवासी जखमी; देवरूख पोलिसांत गुन्हा नोंद :

या अपघातात एस.टी. बस चालक, वाहक आणि बसमधील प्रवासी जखमी झाले असून आयशर टेम्पो व एस.टी. बसचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आयशर चालक रामचंद्र बोभाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.२७ वाजता देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी एस.टी. चालक जितेंद्र संभाजी पाटील याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून देवरूख पोलीस पुढील तपास करत आहेत.