स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक आणि आधुनिक विकासकामांमुळे ‘स्मार्ट सिटी’ रत्नागिरीला पर्यटकांची सर्वाधिक पसंती
रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून तसेच परराज्यांतून पर्यटकांनी कोकणची काशी असलेल्या रत्नागिरीकडे मोठी धाव घेतली आहे. पर्यटकांच्या या प्रचंड गर्दीमुळे रत्नागिरी शहर आणि परिसरातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजेस सध्या ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. स्वच्छता, आधुनिक विकासकामे आणि एकाच परिसरात अनेक ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटनस्थळे उपलब्ध असल्याने पर्यटकांची पहिली पसंती रत्नागिरीला मिळत आहे.
‘स्मार्ट सिटी’ आणि स्वच्छतेच्या मानांकनामुळे वाढले आकर्षण :
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर आधुनिक विकासकामे झाली आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर हे कोकणातील एक ‘स्मार्ट सिटी’ म्हणून वेगाने उदयास येत आहे. याशिवाय, नुकतेच रत्नागिरी नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात देशातील किनारपट्टी शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज शहर अशी ओळख निर्माण झाल्याने पर्यटकांचा रत्नागिरीकडे येण्याचा ओघ लक्षणीयरीत्या वाढला आहे.

शहरात आणि परिसरात पर्यटनस्थळांची मोठी पर्वणी :
रत्नागिरी शहरात एकाच दिवसात पाहण्यासारखी अनेक वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. यामध्ये तारांगण, भव्य शिवसृष्टी, मत्स्यालय, ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला, थिबा राजवाडा, जिजामाता उद्यान, लोकमान्य टिळक जन्मभूमी आणि पतितपावन मंदिर यांसारख्या स्थळांचा समावेश आहे. यासोबतच सायंकाळचा आनंद घेण्यासाठी भाट्ये आणि मांडवी यांसारखे स्वच्छ व विस्तीर्ण समुद्रकिनारे शहरातच असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि किनाऱ्यांचे केंद्रबिंदू :
रत्नागिरी शहरात मुक्काम केल्यास येथून अगदी जवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र गणपतीपुळे, स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस आणि कशेळी येथील कनकादित्य मंदिर आदी प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे पर्यटकांना अत्यंत सोयीचे ठरत आहे. त्यामुळेच दिवाळीच्या सुट्टीत रत्नागिरी शहरातील पर्यटन व्यवसायाला मोठी उभारी मिळाली असून बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे.













