कामगार आयुक्त कार्यालयातर्फे व्यापक जनजागृती व तपासणी मोहीम; आस्थापनांमध्ये तपासणी मोहीम राबवणार
रत्नागिरी : बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबरपासून राज्यभरात ‘बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह’ आयोजित केला जात आहे. या अनुषंगाने कामगार आयुक्त कार्यालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी व्यापक जनजागृती व तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
बालपण हे शिक्षण, आरोग्य आणि आनंदासाठी आहे, कामासाठी नाही. त्यामुळे कोणत्याही आस्थापनेत बालकामगार आढळल्यास नागरिकांनी कामगार कार्यालयास तत्काळ माहिती द्यावी आणि बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.
विविध उपक्रम आणि जनजागृती मोहीम
सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल. दुकाने, हॉटेल्स, आस्थापना व व्यावसायिक ठिकाणी ‘बालकामगार कामावर ठेवू नयेत’ अशा आशयाचे जनजागृतीपर स्टिकर्स लावणे, माहिती पत्रकांचे वाटप करणे तसेच नागरिकांना बालकामगार प्रथेच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली जाणार आहे.

विशेष तपासणी मोहीम आणि कायदेशीर कारवाई
जिल्ह्यातील वीटभट्ट्या, खडी क्रशर, हॉटेल्स, दुकाने, चहाच्या टपऱ्या, गॅरेज व इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामगार विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सहभागातून विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. मोहिमेदरम्यान बालकामगार आढळून आल्यास संबंधित बालकांची मुक्तता करून, संबंधित आस्थापनांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल असोसिएशन, दुकानदारांच्या व्यापारी संघटना, औद्योगिक क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठका आयोजित करून बालकामगार प्रथा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये ‘बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६’ तसेच ‘महाराष्ट्र बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व विनियमन) (पहिली सुधारणा) नियम, २०२५’ मधील तरतुदी, दंडात्मक कारवाई व कायदेशीर परिणामांची माहिती दिली जाईल. या उपक्रमांतर्गत व्यापारी, उद्योजक, आस्थापनाचालक आणि नागरिकांकडून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत सामूहिक शपथ घेतली जाणार असून, बालकामगारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













