स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांचे तातडीने मदतकार्य; पर्यटन हंगामात भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
देवरुख (संगमेश्वर): Marleshwar Temple Accident या दुर्दैवी घटनेत संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. रविवारी मंदिर परिसरात डोंगराच्या कड्यावरून अचानक मोठा दगड कोसळल्याने रुत्वी संदीप पाटील (वय ६, रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) या बालिकेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील संदीप पाटील हे या घटनेत जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथील रहिवासी संदीप पाटील हे रविवारी आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. कुटुंबीय मंदिर परिसरात असताना अचानक वरच्या बाजूच्या डोंगराच्या कड्यावरून एक मोठा दगड निसटून खाली कोसळला. हा दगड थेट सहा वर्षीय रुत्वी हिच्या अंगावर पडल्याने तिला वर्मी आणि गंभीर मार लागला. या दुर्घटनेत तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला. तसेच, सोबत असलेले तिचे वडील संदीप पाटील हे देखील दगड लागल्याने जखमी झाले.
ग्रामस्थ आणि पोलिसांकडून तातडीने मदतकार्य
मंदिर परिसरात ही दुर्घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. या घटनेत जखमी झालेले संदीप पाटील यांना तातडीने पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सध्या कोकणात पर्यटन हंगाम सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येत आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या तीर्थक्षेत्री भाविकांची मोठी वर्दळ असताना डोंगरावरून दगड कोसळण्याची दुर्घटना घडल्याने परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देवदर्शनासाठी आलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यातील कापूसखेड गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.













