Khed News: खेड पंचायत समितीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत आदिवासी लाभार्थ्यांचा सन्मान; भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

Khed News: खेड पंचायत समितीत जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत आदिवासी लाभार्थ्यांचा सन्मान; भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम

जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे आणि प्रांताधिकारी वैशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न; शासकीय कल्याणकारी योजनांची दिली माहिती

खेड (जि. रत्नागिरी): क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’अंतर्गत खेड पंचायत समितीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतील पात्र आदिवासी लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांचा सत्कार
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, खेडच्या प्रांताधिकारी वैशाली पाटील तसेच विजय करपे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या पात्र आदिवासी लाभार्थ्यांना शाल, श्रीफळ, पुष्प आणि सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली.

भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण आणि योजनांचा लाभ
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी दिलेला लढा संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विकासात्मक योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निकम, पवार यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आणि खेड तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Arihant 4