स्वच्छता मोहीम, दीप महोत्सव आणि शासकीय योजनांच्या प्रबोधनाने आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती; रत्नागिरी सर्वसाधारण समितीचा उपक्रम
रत्नागिरी : जनजाती गौरव सप्ताहाचे औचित्य साधून रत्नागिरी सर्वसाधारण समितीतर्फे मंडणगड तालुक्यातील वेरळ आणि लाटवण येथील आदिवासी वाडीत विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागातून स्वच्छता मोहीम, दीप महोत्सव आणि जनजागृती कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडले.
वेरळ व लाटवण वाडीत स्वच्छता मोहीम
या विशेष उपक्रमाची सुरुवात वेरळ येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून करण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व किती मोठे आहे, हे यावेळी विद्यार्थ्यां व नागरिकांना पटवून देण्यात आले. यानंतर लाटवण आदिवासी वाडी येथील समाजमंदिराची स्वच्छता करून उपस्थितांनी उत्तम सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
दीप महोत्सवाचे आयोजन आणि कल्याणकारी योजनांची माहिती
सायंकाळी लाटवण आदिवासी वाडीमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात दीप महोत्सव साजरा करण्यात आला. या दीपमहोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित आदिवासी बांधवांना जनजाती गौरव सप्ताहाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि परंपरांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

यावेळी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सुविधा आणि शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांबाबत सविस्तर प्रबोधन करण्यात आले, ज्याचा लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.













