शरद पवारांच्या राजकारणापलीकडच्या संबंधांची आठवण करून देत नितेश राणेंचा रोहित पवारांवर निशाणा; तर देवेंद्र फडणवीस कोणत्याही चक्रव्यूहात फसणार नसल्याचे सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य
*मुंबई: *अजित पवार अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित केलेले आरोप भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी फेटाळून लावले असून, या मुद्द्यावरून आता मंत्री नितेश राणे आणि नेते सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवारांच्या सामाजिक प्रवासाची आठवण देत नितेश राणेंची टीका
रोहित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. नितेश राणे यांच्या मते, महाराष्ट्रात शरद पवारांचा सामाजिक प्रवास पाहिला, तर त्यांनी नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक संबंध आणि माणुसकी जपली आहे. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले शरद पवारांचे संबंध त्यांनी कधीच राजकारणाशी जोडले नाहीत, अशी आठवण राणे यांनी करून दिली.
पुढे बोलताना नितेश राणे यांनी रोहित पवार यांचा उल्लेख ‘तीनपाट’ आणि ‘पप्पू’ असा करत, "आधी मी त्यांना आपला मित्र आणि अभ्यासू समजायचो, मात्र आता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनाही त्यांनी मागे टाकले आहे. आधी एक मफलर दाखवायचा आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जोडायचे, असे करत त्यांनी स्वतःच्या अकलेचे प्रदर्शन केले आहे," अशा शब्दांत राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

‘देवाभाऊ कलियुगातील अभिमन्यू, चक्रव्यूहात फसणार नाहीत’ : सदाभाऊ खोत
दुसरीकडे, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनीही रोहित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. अजित पवार यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला आदर असून, पुण्यात त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडत असताना रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "शेतामध्ये पेरणी केली की पीक कशाचे येणार हे कळते, पण इथे सहा महिन्यांत संशयाचे पीक बदलत आहे. याचे नेमके बीज महाराष्ट्राला सांगावे. रोहित पवार यांची ही सर्व धडपड केवळ खुर्चीसाठी सुरू असलेली केविलवाणी आणि कपटनीतीची कूटनीती आहे. परंतु, त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, कारण देवाभाऊ हे कलियुगातील अभिमन्यू असून ते तुमच्या कोणत्याही चक्रव्यूहात कधीही फसणार नाहीत."













