Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात ‘राखी डोक्याचा बुलबुल’ पक्ष्याची पहिल्यांदाच नोंद; राजापूर तालुक्यात आढळला वैशिष्ट्यपूर्ण पक्षी

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात 'राखी डोक्याचा बुलबुल' पक्ष्याची पहिल्यांदाच नोंद; राजापूर तालुक्यात आढळला वैशिष्ट्यपूर्ण पक्षी

प्रसिद्ध पक्षी निरीक्षक श्रीकृष्णा मगदूम यांना शोधण्यात यश; पश्चिम घाटातील या दुर्मिळ पक्ष्यामुळे रत्नागिरीच्या पक्षीसंपदेत भर

राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात जगामध्ये केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून गोवा, कर्नाटक व केरळ प्रदेशात प्रामुख्याने दिसणाऱ्या ‘राखी डोक्याचा बुलबुल’ (Grey-headed Bulbul) या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याची जिल्ह्यात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. प्रसिद्ध पक्षी निरीक्षक श्रीकृष्णा मगदूम यांना राजापूर तालुक्यात हा दुर्मिळ पक्षी आढळून आला आहे.

रत्नागिरीच्या समृद्ध निसर्गसंपदेत नव्या पक्ष्याची भर
समुद्रसपाटीपासून थेट पश्चिम घाटाच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम घाटाची निसर्गसंपदा लाभली आहे. जिल्ह्यात विविध जातींचे वन्यजीव आणि पक्ष्यांचा अधिवास सातत्याने राहिल्याने अभ्यासकांचे नेहमीच जिल्ह्याकडे लक्ष असते. सध्या जिल्ह्यात विविध जातींच्या ३६६ जातींच्या पक्ष्यांचा अधिवास असताना, त्यात आता या नव्या वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्याची भर पडली आहे.

पक्ष्याची शारीरिक वैशिष्ट्ये आणि आहार
पहिल्यांदाच निदर्शनास आलेल्या या राखी डोक्याचा बुलबुल पक्ष्याच्या शरीराचा रंग हिरवट ऑलिव्ह असून, डोके, मानेचा भाग आणि गळा राखी रंगाचा असतो. कपाळावर पिवळसर हिरवी छटा असते, तर डोळ्यांचा रंग फिकट निळसर पांढरा असून चोच करड्या-हिरव्या रंगाची असते. डोक्यावरील राखी रंगामुळेच त्याला ‘राखी डोक्याचा बुलबुल’ असे नाव मिळाले आहे. जंगलातील दाट झाडाझुडपांमध्ये वावरणारा हा पक्षी जंगली फळे, बेरी आणि लहान कीटकांचा आहार घेतो.

Infigo eyecare

प्रजनन काळ आणि संवर्धन दर्जा
सदाहरीत जंगलामध्ये बांबूची बेटे, दाट झुडपे आणि फळझाडे त्याच्या अधिवासासाठी महत्त्वाची असतात. साधारणपणे मार्च ते जुलै हा या पक्ष्याचा प्रजननाचा काळ असून, हा स्थलांतरित पक्षी नसून पश्चिम घाटात आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे. मर्यादित भौगोलिक अधिवास आणि जंगलावरील अवलंबीतल्यामुळे त्याच्या अधिवासाचे संवर्धन महत्त्वाचे मानले जाते. ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स २०२५’ च्या माहितीनुसार या पक्ष्याचा जागतिक स्तरावरील संवर्धन दर्जा ‘लिस्ट कन्सर्न’ (Least Concern) असून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमच्या अनुसूची-२ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.