बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरून चिंता व्यक्त; तरुण पिढी निराश असल्याचा दावा, तर भारताची बदनामी करत असल्याचा भाजपचा आरोप
मुंबई: Rahul Gandhi US Visit दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात आयोजित शैक्षणिक कार्यक्रमात भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून, शिक्षण व्यवस्थेतील सध्याच्या धोरणांमधील त्रुटींमुळे भारतावर मोठे आर्थिक संकट येत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय राजकारणात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक लिडिया पोलग्रीन यांनी भारतातील तरुणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. देशातील मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांचा एक मोठा वर्ग सध्याच्या परिस्थितीमुळे निराश असल्याचे त्यांनी नमूद केले. औपचारिक शिक्षण घेतलेले असतानाही या तरुणांना देशात स्वतःचे पुढील भविष्य दिसत नसल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. या दौऱ्यातील पुढील टप्प्यात राहुल गांधी आज शिकागो येथील विद्यापीठात संवाद साधणार आहेत.
करिअरच्या संधीअभावी तरुण आणि पालकांमध्ये वाढती दरी
रोजगार आणि करिअरच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तरुण पिढी आणि त्यांच्या आई-वडिलांमध्ये दुरावा वाढत असल्याचे निरीक्षण राहुल गांधी यांनी मांडले. नवीन पिढी आता जुन्या पिढीच्या सल्ल्यावर आणि अनुभवावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. "तुम्ही स्वतःच यशस्वी नाही आहात, तुमच्याकडे नोकऱ्या नाहीत, त्यामुळे तुम्ही आम्हालाही त्याच जुन्या मार्गावर चालण्यास सांगू शकत नाही," असे आजची तरुणाई आपल्या पालकांना स्पष्टपणे सांगत असल्याचे आपल्याला थेट पालकांकडूनच ऐकायला मिळत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. जुन्या पिढीने निवडलेला मार्ग आता कालबाह्य झाल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भाजपचा जोरदार पलटवार; देशाची बदनामी करत असल्याचा आरोप
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींवर टीका करताना, ते परदेशात जाऊन भारताविरोधात दुष्प्रचार आणि देशाची बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप केला. एकीकडे संपूर्ण जग भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे मान्य करत असताना, दुसरीकडे राहुल गांधी भारतावर आर्थिक संकट येत असल्याचे आरोप करत लोकशाहीविरोधात बोलत असल्याचे प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे.













