Diwali Faral Parcel Service: रत्नागिरी डाक विभागाच्या ‘दिवाळी फराळ पार्सल’ सेवेला अभूतपूर्व प्रतिसाद; २८ देशांमध्ये पाठवला १,००० किलोहून अधिक फराळ

Diwali Faral Parcel Service: रत्नागिरी डाक विभागाच्या 'दिवाळी फराळ पार्सल' सेवेला अभूतपूर्व प्रतिसाद; २८ देशांमध्ये पाठवला १,००० किलोहून अधिक फराळ

Diwali Faral Parcel Service अंतर्गत १५९ आंतरराष्ट्रीय पार्सलचे बुकिंग; रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतून सर्वाधिक पसंती, घरपोच ‘पार्सल पिकअप’ सुविधेचा मोठा फायदा

रत्नागिरी: Diwali Faral Parcel Service ला रत्नागिरी जिल्ह्यातून यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, या विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरीतून २८ देशांमध्ये १५९ पार्सलद्वारे १,००० किलोहून अधिक खुसखुशीत फराळ पाठवण्यात आला आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या आप्तेष्टांना दिवाळीत घरच्या फराळाची उणीव भासू नये, यासाठी रत्नागिरी डाक विभागाने हा विशेष उपक्रम राबवून सातासमुद्रापार मायदेशातील मायेची ऊब पोहोचवली आहे.

दिवाळीचा सण जवळ आला की, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरच्या लाडू, करंजी आणि चकलीची विशेष ओढ लागते. नागरिकांची हीच भावना ओळखून टपाल विभागाने ऑक्टोबर महिन्यापासून ही विशेष सेवा सुरू केली होती. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रत्नागिरी डाक विभागाने थेट घरपोच ‘पार्सल पिकअप’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. नोंदणीपासून ते पार्सल परदेशात रवाना होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आल्याने ग्राहकांचा विभागावरील विश्वास अधिक दृढ झाला.

रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांतून सर्वाधिक सहभाग
१२ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी विभागातून एकूण १५९ आंतरराष्ट्रीय पार्सलचे बुकिंग झाले असून, प्रत्येक पार्सलचे सरासरी वजन सुमारे ५ किलो इतके होते. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून रत्नागिरी आणि राजापूर या दोन तालुक्यांतून या उपक्रमाला सर्वाधिक पसंती मिळाली असून, स्थानिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

Arihant 2

डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांचा उत्साह यांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे.

"परदेशातील भारतीयांपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांचे प्रेम पोहोचवण्याचे समाधान या उपक्रमातून मिळाले आहे. नागरिकांचा हाच प्रतिसाद लक्षात घेता भविष्यातही अशाच नावीन्यपूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विभाग कटिबद्ध राहील. जनतेने या सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा."
– ज्ञानेश कुलकर्णी (अधीक्षक, रत्नागिरी डाक विभाग)