Vilas Dholye Lifetime Achievement Award: संगमेश्वरचे सुपुत्र विलास ढोल्ये यांना ‘लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड २०२६’; औषधनिर्मिती क्षेत्रातील योगदानाचा गौरव

Vilas Dholye Lifetime Achievement Award: संगमेश्वरचे सुपुत्र विलास ढोल्ये यांना 'लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड २०२६'; औषधनिर्मिती क्षेत्रातील योगदानाचा गौरव

हैदराबादमधील भव्य सोहळ्यात एमिनन्स बिझनेस मीडियातर्फे सन्मान; कोकण ते जागतिक पातळीवरील प्रवासाने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शिवणे या छोट्याशा गावात जन्मलेल्या आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर भारतीय तसेच जागतिक पातळीवर औषधनिर्मिती उद्योगात विशेष ठसा उमटवणाऱ्या विलास ढोल्ये यांना प्रतिष्ठेचा ‘लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरवण्यात आला आहे. हैदराबाद येथे आयोजित ‘फार्मा मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑटोमेशन एक्सलन्स अॅवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्यात एमिनन्स बिझनेस मीडिया (Eminence Business Media) यांच्यातर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीचा, नेतृत्वगुणांचा आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील भरीव योगदानाचा हा गौरव आहे.

विलास ढोल्ये यांचे आई-वडील व्यवसायाने शेतकरी होते आणि दोघांचेही शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंत झाले होते. त्यांचे वडील कै. मुरलीधर ढोल्ये ऊर्फ दादा ढोल्ये हे प्रगतिशील शेतकरी होते. अशा संस्कारक्षम वातावरणात विलास यांचे बालपण शिवणे गावात पाचवीपर्यंत गेले. त्यांचे ज्येष्ठ बंधू विजय ढोल्ये देवरूख येथे नामांकित सनदी लेखापाल (सीए) म्हणून परिचित आहेत. सहावीपासून शिक्षणासाठी त्यांना आई-वडिलांपासून दूर राहावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या राहण्याची व्यवस्था, दैनंदिन गरजा व शिक्षणाची जबाबदारी लहान वयातच समर्थपणे सांभाळली. देवरूख येथे शालेय शिक्षण पूर्ण करताना अकरावीच्या (एसएससी) परीक्षेत त्यांनी शाळेच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानंतर रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयात शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठाच्या प्री-प्रोफेशनल परीक्षेतही त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या यशामुळे त्यांना मुंबई येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत प्रवेश मिळाला. संपूर्ण भारतातून केवळ ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या या संस्थेतून १९७३ मध्ये त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. परदेशात उच्च शिक्षणाची संधी असतानाही त्यांनी भारतातच राहून नोकरी करणे आणि आई-वडिलांना आधार देणे पसंत केले.

विविध उद्योगसमूहांमधील प्रदीर्घ व यशस्वी कारकीर्द
१९७३ पासून विलास ढोल्ये यांनी विविध उद्योगसमूहांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत आपली कारकीर्द घडवली. १९८८-८९ मध्ये घरडा केमिकल्सच्या माध्यमातून लोटे परशुराम येथे कृषी रसायनांच्या उत्पादनासाठी उभारण्यात आलेला ग्रीनफिल्ड प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत झाला. उद्योगाच्या विकासाबरोबरच स्थानिक समाज आणि कोकणाच्या प्रगतीप्रति त्यांनी बांधिलकी जपली. २००० सालानंतर त्यांनी औषधनिर्मिती (फार्मास्युटिकल) क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढील सुमारे १५ वर्षे डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व सिप्ला यांसारख्या भारतातील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. डॉ. रेड्डीजमध्ये त्यांनी कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून भारत, अमेरिका व ब्रिटनमधील उत्पादन प्रकल्पांच्या कामकाजाची जबाबदारी सांभाळली. २०१५ पासून ते देश-विदेशी अनेक औषधनिर्मिती कंपन्यांना उत्पादन व्यवस्थापन, औद्योगिक कार्यक्षमता, पुरवठा साखळी आणि मनुष्यबळ विकास या क्षेत्रांत सल्लागार व मार्गदर्शक म्हणून सेवा देत आहेत.

Amey jwelrs

कोकणातील स्थानिक उद्योगविकासापासून जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रातील नेतृत्वापर्यंत त्यांनी गाठलेली उंची रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, या यशाने शिवणे, संगमेश्वर आणि संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.