संगमेश्वर तालुक्यातील भीषण अपघात; भरधाव कंटेनर चालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू
देवरुख: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर संगमेश्वर तालुक्यातील गोळवली टप्प्या येथे भरधाव कंटेनरने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एक भीषण अपघात घडला आहे. १५ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, दोन्ही चालक जखमी झाले आहेत. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील पेठ किल्ला, कुरणवाडी परिसरात राहणारे ट्रक चालक सचिन प्रभाकर गोलतकर (वय ५२) हे रविवारी रात्री आपल्या ताब्यातील टाटा ट्रक (क्र. एमएच ०८ एपी ५८४०) घेऊन रत्नागिरीहून ठाण्याच्या दिशेने निघाले होते. रात्री ८.५५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रक महामार्गावरील गोळवली टप्प्या येथे आला असता, गोव्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरच्या (क्र. एमएच ८६ सीयू ५५३९) चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोलतकर यांच्या ट्रकला मागून जोरदार ठोकले. हा अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या धडकेत ट्रक चालक सचिन गोलतकर यांच्यासह कंटेनर चालक शिवकुमार नरेंद्र दुबे (वय ३६, रा. टिकर, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) हे दोघेही जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या अपघातप्रकरणी ट्रक चालक सचिन गोलतकर यांनी सोमवारी, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक शिवकुमार दुबे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.













