लांजा तहसीलदारांना निवेदन सादर; महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप, उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहणार
लांजा: Anjanari Rasta Roko आंदोलनाचा आक्रमक पवित्रा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतला असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी येथे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रशासनाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, या परिसरातील अपघातांची मालिका थांबवून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अंजणारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांनी सोमवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
ठाकरे शिवसेनेच्या वतीने लांजाचे नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १८ वर्षांहून अधिक काळ रखडलेले असून कामातील दिरंगाई, नियोजनाचा अभाव आणि कामाच्या दर्जाबाबत निर्माण झालेल्या शंका यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये लांजा तालुक्यातील अंजणारी येथे सतत अपघातांची मालिकाच सुरू असून, या अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, तसेच प्रवाशांना आर्थिक फटका बसण्याबरोबरच जीवितहानीच्या गंभीर घटनाही घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच याच परिसरातील अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यालाही आपला जीव गमवावा लागला होता, त्यामुळे अंजणारी एकप्रकारे मृत्यूचा सापळा बनत असल्याची चिंताजनक बाब शिवसेनेने निदर्शनास आणून दिली आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी ठोस पावले उचलण्याची मागणी
अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलणे अपेक्षित असताना केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना, योग्य दिशादर्शक फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे.

संबंधित प्रशासनाच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार असून, या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, माजी उपसभापती सुभाष रामाने, उपविभागप्रमुख शांताराम गुरव, अल्लादिन नेवरेकर, बाबा धावणे, भालचंद्र लाड, अक्षय कुरूप, मंगेश लांजेकर, बाळकृष्ण गुजर, शाखाप्रमुख किरण बेर्डे, शिवाजी भालेकर, मंगेश आंबेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













