विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि सचिन सावंतांकडून तीव्र शब्दांत निषेध; पुस्तक फाडताना बाळासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी ठाकरे गटाचे मुंबईत आंदोलन
मुंबई: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या पुस्तकाची प्रत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत फाडल्याप्रकरणी राजकारणात मोठा गदारोळ उडाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुस्तकात अपमान करण्यात आल्याचा आरोप करत शिंदे गटाने या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती; मात्र, या आंदोलनादरम्यान शायना एनसी यांच्याकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो चुकून फाडला गेल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि सचिन सावंत यांनी शिंदे गटावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, "या देशात कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही? संजय निरुपम काय बोलतात? शायना एनसी बाळासाहेबांचा फोटो फाडत आहेत. कालच बाळासाहेबांचा स्मृती दिन होता, पण आज बाळासाहेबांचा फोटो फाडला याचे भान नाही, हा निर्लजपणाचा कळस आहे," अशा शब्दांत संताप व्यक्त केला. तसेच देशात या पुस्तकाला मोठी मागणी असून विरोधक आर RSS ची तळी उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत, "प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं गेलं असून, त्यांनी दोन पाप केली आहेत. एका बाजूला आयुष्य देशासाठी घालवणाऱ्या महिलेचे पुस्तक फाडले आणि दुसरीकडे बाळासाहेबांचाही अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांनी माफी मागितली पाहिजे," अशी मागणी केली.
कॉंग्रेसचा घणाघात; ठाकरे गटाचे महापालिकेत आंदोलन
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही शिंदे गटाच्या भूमिकेचा समाचार घेतला. "ज्या पक्षाची विचारधारा खोक्यांपासून सुरू होते आणि खोक्या संपते, त्यांच्या पुस्तक फाडण्याने काय फरक पडणार? पुस्तके फाडण्याचे काम अडाणी लोक करतात, शहाणे प्रतिवाद करतात. फाडायचे असेल तर विकत घेऊन फाडा, आम्ही अजून छापू," असा खोचक टोला त्यांनी लगावला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सोशल मीडियावर दोन शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले.

दुसरीकडे, शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांनी जोरदार आंदोलन करत शिंदेंच्या शिवसेनेविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे राजकारण आता बाळासाहेबांच्या फोटो अवमानाच्या मुद्द्यावर येऊन ठेपल्याने आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.













