Chiplun News: टेरव गावात तीव्र पाणीटंचाई; १ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा सरपंच किशोर कदम यांचा इशारा

Chiplun News: टेरव गावात तीव्र पाणीटंचाई; १ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा सरपंच किशोर कदम यांचा इशारा

मंजूर नळपाणी योजनांची कामे तातडीने सुरू करण्याची आणि टँकरने पाणीपुरवठा करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

चिपळूण: Terav Water Scarcity च्या समस्येने चिपळूण तालुक्यातील टेरव गावात गंभीर स्वरूप धारण केले असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर असलेल्या नळपाणी योजनांची कामे तातडीने सुरू करावीत आणि कामे पूर्ण होईपर्यंत टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी टेरवचे सरपंच किशोर कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने कार्यवाही न केल्यास मंगळवार, १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती चिपळूण येथील पाणीपुरवठा विभागासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टेरव गावातील बौद्धवाडी, तांबडवाडी, दत्तवाडी हनुमान मंदिर परिसर, दत्तवाडी मराठीवाडी, वरची सुतारवाडी आणि खालची सुतारवाडी आदी भागांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

मंजूर योजनांच्या कामांना गती देण्याची मागणी
गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनअंतर्गत दोन नळपाणी योजनांना मंजुरी मिळाली असून, दत्तवाडीच्या स्वतंत्र नळपाणी योजनेलाही मान्यता प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू झाले होते आणि पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक जागाही ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे; मात्र अद्याप या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. याशिवाय वेतकोंडवाडी येथील पाण्याच्या टाकीपासून स्वतंत्र पाणीपुरवठा लाईन टाकण्याच्या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यता दिली असून, या कामाचा जलजीवन मिशनमध्ये समावेश करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरपंचांनी निवेदनात केली आहे.

Shanti2

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याची अपेक्षा
या निवेदनाची प्रत पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शेखर निकम, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेरव गावाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि मंजूर कामे सुरू करण्याची निश्चित तारीख व पूर्णत्वाची कालमर्यादा लेखी कळवावी, असे निवेदनात नमूद केले आहे. महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा सरपंच किशोर कदम यांनी व्यक्त केली आहे.