Tulsi Vivah 2026: आज कार्तिक शुक्ल द्वादशी; घरोघरी तुळशी विवाहाचा मंगल सोहळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि पारंपरिक पूजाविधी

Tulsi Vivah 2026: आज कार्तिक शुक्ल द्वादशी; घरोघरी तुळशी विवाहाचा मंगल सोहळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि पारंपरिक पूजाविधी

तुळशी विवाहानंतर विवाह सोहळे व इतर शुभकार्यांना होणार सुरुवात

Tulsi Vivah 2026 निमित्त दिवाळीनंतर येणाऱ्या या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला आज शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि मंगल मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी माता आणि भगवान विष्णू यांच्या शाळिग्राम स्वरूपाचा विवाह लावण्याची परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळे आणि इतर शुभकार्यांना सुरुवात होते, अशी धार्मिक मान्यता असल्याने घरोघरी तुळशी वृंदावन सजवून मंगलाष्टकांच्या गजरात हा विवाह सोहळा पार पाडला जातो.

धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, अनेक कुटुंबांमध्ये कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सोयीनुसार कोणत्याही दिवशी तुळशी विवाह लावण्याची प्रथा आहे. मात्र, कार्तिक शुक्ल द्वादशी हा विवाहासाठी विशेष महत्त्वाचा दिवस मानला जात असल्याने बहुतांश कुटुंबांमध्ये आज सायंकाळी हा विवाह सोहळा साजरा केला जाईल.

Tulsi Vivah 2026 तिथी आणि शुभ मुहूर्त
धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाहासाठी प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्तानंतरचा संध्याकाळचा काळ विशेष शुभ मानला जातो. पंचांगानुसार २१ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या महत्त्वाच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:

Pednekar sankul

तुळशी विवाहाची तारीख आणि वार: शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६

द्वादशी तिथी प्रारंभ: २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी

द्वादशी तिथी समाप्ती: २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांनी

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त: सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून रात्री ७ वाजून ४९ मिनिटांपर्यंत

गोधूली मुहूर्त: सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिटे

(टीप: स्थानिक सूर्योदय, सूर्यास्त आणि पंचांगानुसार मुहूर्ताच्या वेळेत फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील पंचांग किंवा पुरोहितांचा सल्ला घेऊन विवाहाची वेळ निश्चित करावी.)

तुळशी विवाहाचा पारंपरिक विधी
तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी घरातील तुळशी वृंदावन स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाते आणि अंगणात रांगोळी काढली जाते.

तुळशीच्या रोपाला नवीन साडी, हिरव्या बांगड्या, कुंकू, हळद आणि फुलांनी वधूप्रमाणे सजवले जाते व भोवती उसाचा मंडप उभारला जातो.

तुळशीच्या शेजारी भगवान शाळिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून गणपती पूजन केले जाते व तुळशी-शाळिग्रामाची विधिवत पूजा पार पाडली जाते.

दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात आणि अक्षता टाकून विवाह लावला जातो.

काही कुटुंबांमध्ये तुळशीचे कन्यादान करण्याचीही परंपरा असून, त्यानंतर आरती, मंत्रपुष्प आणि प्रसादाचे वाटप केले जाते.

तुळशी विवाहाचे धार्मिक महत्त्व
हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तिला ‘वृंदा’ असेही संबोधले जाते. आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिकी अर्थात प्रबोधिनी एकादशीला योगनिद्रेतून जागे होऊन चातुर्मासाची समाप्ती होते. भगवान विष्णू जागे झाल्यानंतर देवी वृंदा आणि भगवान विष्णू यांच्या शाळिग्राम स्वरूपाचा हा प्रतीकात्मक विवाह सोहळा पार पडतो. या विवाहामुळे घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद नांदतो, तसेच तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ((टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)