Ratnagiri Teacher Recruitment: जिल्हा परिषदेतील १९९ नवीन शिक्षकांना समुपदेशनानंतर जाग्यावरच नियुक्तीपत्रे सुपूर्द

Ratnagiri Teacher Recruitment: जिल्हा परिषदेतील १९९ नवीन शिक्षकांना समुपदेशनानंतर जाग्यावरच नियुक्तीपत्रे सुपूर्द

पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या मराठी विषयाच्या २०२ पैकी १९९ उमेदवारांना पारदर्शक पद्धतीने शाळांचे वाटप

रत्नागिरी: Ratnagiri Teacher Recruitment प्रक्रियेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील भरतीने सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी निर्णायक टप्पा गाठला. दिवाळीनंतर प्रतीक्षेत असलेल्या मराठी विषयाच्या २०२ शिक्षकांच्या समुपदेशनाला अखेर मुहूर्त मिळाला असून, जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेत १९९ उमेदवारांना प्रशासनातर्फे तत्काळ नियुक्तीपत्र आदेश सुपूर्द करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडलेल्या या प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने सर्व उमेदवारांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळपासूनच उमेदवारांनी सभागृहात मोठी गर्दी केली होती. एकूण २०२ पात्र उमेदवारांपैकी १९९ उमेदवार समुपदेशनास प्रत्यक्ष उपस्थित राहिले, तर ३ उमेदवार अनुपस्थित होते.

संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक शाळा वाटप
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि जिल्ह्यातील रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार शाळांची निवड करण्याची संधी देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणाली आणि कागदपत्रांच्या अचूक पडताळणीद्वारे पारदर्शकपणे राबविण्यात आल्याने उपस्थित उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे, तसेच विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते.

Shanti real estate 1

ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेला चालना
निवड झालेल्या सर्व १९९ शिक्षकांना समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होताच जाग्यावरच नियुक्तीपत्रे देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या नवीन शिक्षकांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरून निघण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध होऊन शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितच चालना मिळणार आहे.