Koyna Water Diversion आणि कोकण हापूसच्या भौगोलिक मानांकाच्या प्रश्नावर निकम यांची ठाम भूमिका; विधिमंडळात आवाज उठवण्याचा निर्धार
चिपळूण: Koyna Water Diversion च्या प्रस्ताववरून चर्चा सुरू असतानाच, कोकणातील जनतेची तहान भागल्याशिवाय हे पाणी कुठेही जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार शेखर निकम यांनी मांडली आहे. चिपळूण तालुक्यातील चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोकणातील पाणीप्रश्न आणि हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.
कोयना धरणातील पाणी थेट मुंबईला नेण्याविषयी प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी यासंदर्भातील अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, आजही कोकणातील अनेक गावांना पाण्याची तीव्र आवश्यकता असल्याने स्थानिक गरजा पूर्ण न करता हे पाणी मुंबईकडे वळवणे योग्य ठरणार नाही, असे निकम यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आयआयटीकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सिद्ध करण्याचे दायित्व सोपवल्याची माहिती त्यांनी दिली आणि जलसंपदा विभागाचे आभार मानले.
सिंचन, नळपाणी योजना आणि विधिमंडळातील भूमिका
पाणी उपसा करताना विजेचा खर्च अल्प राहील असे नियोजन करून धामणवणे, टेरव तसेच खालच्या गावांमधील नळपाणी योजना आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सिंचनासाठी अधिकाधिक पाणी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे आमदार निकम यांनी सांगितले. कोकणातील हा पाणीप्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकण हापूसच्या भौगोलिक मानांकावर चिंता
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोकणातील हापूस आंब्याला मिळालेल्या भौगोलिक मानांकनाच्या कक्षेत वलसाड आणि जुन्नर यांचा समावेश करण्याच्या हालचालींविषयी आमदार निकम यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. कोकणच्या हापूस आंब्याची विशिष्ट चव, सुगंध आणि दर्जा यांमुळे त्याला देश-विदेशात स्वतंत्र प्रतिष्ठा लाभली आहे. हा मुद्दा कोकणच्या आर्थिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असल्याने स्थानिक आंबा उत्पादकांचे हित जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
एकत्र येण्याचे आवाहन आणि कायदेशीर लढ्याचा निर्धार
भौगोलिक मानांकाचा हा विषय कायदेशीर स्वरूपाचा असल्याने कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले. कोकणचा पाण्याचा हक्क आणि हापूसची स्वतंत्र ओळख अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.













