Koyna Water Issue वरून रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांची स्पष्ट भूमिका; जलसंपदा मंत्र्यांच्या घोषणेनंतर कोकणातील पाण्याच्या हक्काचा मुद्दा ऐरणीवर
रत्नागिरी: Koyna Water Issue संदर्भात कोकणचे पाणी कोकणालाच द्यावे, अशी आग्रही मागणी कोकणचे अभ्यासक आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी २३ नोव्हेंबर रोजी केली आहे. वीजनिर्मितीनंतर कोयनेचे वाहून जाऊन समुद्रात मिळणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळवणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत पुन्हा एकदा केल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देताना ॲड. पाटणे यांनी रत्नागिरीतून आपली ही भूमिका स्पष्ट केली.
२९० किमी जलवाहिनी प्रस्ताव आणि हवाई सर्वेक्षण
कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी २९० किलोमीटर अंतरावरील मुंबईत जलवाहिन्यांच्या माध्यमातून नेण्याचा प्रस्ताव नव्याने समोर आला असल्याची माहिती ॲड. पाटणे यांनी दिली. या प्रकल्पासाठीचे हवाई सर्वेक्षण व्हॅसकॉम कंपनीने नुकतेच पूर्ण केले असून, त्यासाठी ३८ कोटी रुपये इतका खर्च झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पेंडसे समितीचा अहवाल आणि कोकणातील पाणीटंचाईचे वास्तव
पाटबंधारे विभागाचे माजी सचिव पेंडसे समितीने कोयनेच्या पाण्याचा वापर सर्वप्रथम रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी करावा, असे स्पष्टपणे म्हटले होते. कोकणातील परिस्थितीकडे लक्ष वेधताना पाटणे यांनी सांगितले की, १५० इंच पाऊस पडणाऱ्या कोकणात पावसाळ्यात महापुरामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान होते; तर दुसरीकडे उन्हाळ्यात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन मैलोन् मैल पायपीट करावी लागते. कोकणातील हे दुष्टचक्र थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘रिपरिअन राइट’नुसार स्थानिकांचा हक्क
मुंबईतील पाण्याचा प्रश्न कितीही गंभीर असला, तरी पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क अर्थात ‘रिपरिअन राइट’ (Riparian Right) प्राधान्याने मान्य केला पाहिजे. त्यामुळे कोकणचे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे, असे आग्रही मत ॲड. विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.













