Sangameshwar News: साखरप्यात बेकायदेशीर स्त्री भ्रूणहत्या उघड; खासगी डॉक्टरसह पतीला अटक

Sangameshwar News: साखरप्यात बेकायदेशीर स्त्री भ्रूणहत्या उघड; खासगी डॉक्टरसह पतीला अटक

गर्भपातादरम्यान तीव्र रक्तस्त्राव झाल्याने प्रकार आला उघडकीस; देवरुख न्यायालयाकडून दोघांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

संगमेश्वर: Sakharpa Female Foeticide प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे करवीर तालुक्यातील एका दांपत्याने बेकायदेशीर स्त्री भ्रूणहत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साखरपा येथे खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. विजय नारकर यांच्यासह संबंधित दांपत्याविरुद्ध देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉक्टर आणि पती या दोघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. सायंकाळी देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर संबंधित महिलेवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रक्तस्त्रावामुळे प्रकार उघडकीस
देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एक दांपत्य १९ तारखेला गर्भपातासाठी साखरपा येथील खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. विजय नारकर यांच्याकडे आले होते. १६ ते १८ आठवड्यांच्या स्त्री भ्रूणाचा गर्भपात करताना संबंधित महिलेला तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने घाबरलेल्या डॉक्टर आणि दांपत्याने पुढील उपचारासाठी महिलेला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथील स्त्रीरोग तज्ञांनी तपासणी केल्यानंतर हा बेकायदेशीर स्त्री भ्रूणहत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणाची खात्री पटल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी साखरपा येथील डॉक्टर आणि दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा स्पष्ट अहवाल दिला.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालाच्या आधारे देवरुख पोलीस स्थानकात डॉ. विजय नारकर यांच्यासह पती-पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८८, १२५ (ब) तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे अधिनियम १९९४ च्या कलम ४, ५ (२), २३ (१), २३ (३) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करत आहेत.

Yash siddhi2

आरोपी डॉक्टरवर यापूर्वीही गुन्हा; रॅकेटचा तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा उपविभागाचे उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुख पोलीस स्थानकाला भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. संबंधित डॉक्टरवर यापूर्वी २०२४ मध्ये करवीर येथे स्त्री भ्रूणहत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती उपअधीक्षक कदम यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दांपत्य थेट साखरपा येथे आल्याने या ठिकाणी यापूर्वीही असे प्रकार घडले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.