तंबाखूच्या वादातून १७ नोव्हेंबरला झाला होता खून; तांत्रिक तपासाच्या आधारे चिपळूण पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला राजारामपुरीतून घेतले ताब्यात
चिपळूण: Walope Murder Case प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे नवनाथ कांबळे यांचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला चिपळूण पोलिसांनी कोल्हापुरातून अटक केली आहे. पवन आंबेडे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर येणाऱ्या-जाणाऱ्या कॉलच्या तांत्रिक तपासावरून पोलिसांनी त्याचा माग काढत कोल्हापुरातील राजारामपुरी येथून त्याला ताब्यात घेतले.
तंबाखूच्या वादातून झाली होती हत्या
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी तंबाखू देण्याघेण्याच्या कारणावरून मयत नवनाथ कांबळे आणि आरोपी पवन आंबेडे यांच्यात भांडण झाले होते. त्याच जुन्या वादाचा राग मनात धरून १७ नोव्हेंबर रोजी वालोपे येथे हे दोघे पुन्हा समोरासमोर आले. यावेळी त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली. या वादादरम्यान नवनाथ यांनी आरोपी पवनला मारहाण केली. त्यावेळी नशेत असलेल्या पवनने नवनाथ यांना खाली पाडून त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. दगडाने ठेचल्याने गंभीर जखमी झालेल्या नवनाथ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
एका फोन कॉलवरून पोलिसांनी लावला छडा
खून घडल्यानंतर आरोपी पवन आंबेडे याने एका मुलाकडून मोबाईल घेऊन आपल्या मैत्रिणीला फोन केला होता. तपासादरम्यान ही माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी संबंधित मुलाकडून आरोपीच्या मैत्रिणीचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्या क्रमांकावर येणाऱ्या-जाणाऱ्या कॉलची माहिती तपासून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. या तांत्रिक तपासातून आरोपीची ओळख आणि त्याचे नेमके ठिकाण निश्चित करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी कोल्हापुरातील राजारामपुरी येथे लपून बसल्याचे निष्पन्न होताच चिपळूण पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले आणि त्याला ताब्यात घेतले.

आरोपी सराईत गुन्हेगार आणि तडीपार
अटक करण्यात आलेला आरोपी पवन आंबेडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, तो तडीपारही होता. नशेत असताना दिवसाढवळ्या घरफोड्या करण्याची त्याची गुन्हेगारी पद्धत असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या अटकेमुळे त्याच्याशी संबंधित अन्य घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास होण्याची शक्यता असून, परिसरातील घरफोड्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. या खून प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करत आहेत.













