जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर फ्लॅटधारकांना कायदेशीर ओळख मिळणार; ३० दिवसांत हरकती व सूचना मागवल्या
Vertical property card देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने जाहीर केला असून, जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर स्वतंत्र ओळख व कायदेशीर हक्क देणारी ही योजना राज्यातील अंदाजे ७ कोटी सदनिकाधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत याबाबत माहिती दिली असून, नियमावलीचा मसुदा महसूल विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यावर ३० दिवस नागरिक व तज्ज्ञांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार असून, त्यानंतर पुढील दोन महिन्यांत नियमावली अंतिम करून ती राज्यभर लागू केली जाईल.
सातबारा व मिळकत पत्रिकेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न
ग्रामीण भागात जमिनीसाठी सातबारा आणि शहरी भागात मिळकत पत्रिका (CTS) उपलब्ध असते, मात्र फ्लॅटधारकांकडे स्वतंत्र ओळख व मालकी हक्काचा ठोस अभिलेख नव्हता. हीच पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी महसूल राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
नमुन्यांची रचना आणि डिजिटल प्रॉपर्टी कार्ड
नव्या रचनेनुसार नागरी भागातील इमारतींसाठी ‘D1’ आणि ‘D2’ असे दोन नमुने, तर ग्रामीण भागातील इमारतींसाठी स्वतंत्र अभिलेख निश्चित करण्यात आले आहेत:

D1 नमुना: मूळ मालक, जमीन, मंजूर बांधकाम आराखडा, खुली जागा, रस्ते आणि सामाईक क्षेत्राचा सर्वसमावेशक मुख्य अभिलेख यामध्ये राहून सामाईक जागेवर सर्वांचा हक्क नोंदवला जाईल.
D2 नमुना: प्रत्येक फ्लॅटधारकाचे नाव, सदनीका क्रमांक, मंजूर क्षेत्रफळ आणि संबंधित हक्कांची स्वतंत्र नोंद यामध्ये केली जाईल.
ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील इमारतींसाठी ‘IA – गाव नमुना ७ क’ आणि ‘IB’ गाव नमुना ७ ड या स्वरूपात अभिलेख तयार केले जातील.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाणार असून, मंजुरीनंतर फ्लॅटधारकांना एटीएम कार्डप्रमाणे खिशात ठेवता येईल असे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होईल. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे (सिडको, नैना, महापालिका, नगरपालिका), महारेरा आणि भूमी अभिलेख विभागाचे API माध्यमातून एकत्रीकरण केले जाणार आहे. इमारतीचा पुनर्विकास झाल्यास जुन्या नोंदी बंद करून नवीन आराखड्यानुसार अद्ययावत नोंदी केल्या जातील.
बोजे, कर्ज आणि पुनर्विकास प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण
फ्लॅटवर बँकेचे कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर किंवा सोसायटीची थकबाकी, न्यायालयीन निर्बंध अथवा शासकीय देणी असल्यास त्याची थेट नोंद संबंधित प्रॉपर्टी कार्डवर होईल. बिल्डरचे कॉमन कर्ज मुख्य नोंदीवर तर वैयक्तिक कर्ज संबंधित सदनीकाधारकाच्या कार्डवर दिसेल. अधिकृत बांधकाम, मंजूर नकाशा आणि संबंधित कागदपत्रे असलेल्या प्रकल्पांनाच हे कार्ड मिळणार असून, अनधिकृत बांधकामांना यातून वगळण्यात आले आहे.
डीम कन्व्हेयन्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल, नगरविकास आणि सहकार विभागाची कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच, नियमावली अधिक अचूक तयार करता यावी यासाठी नागरिकांनी व माध्यमांनी मसुद्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.













