भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पोहोचला. दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत पोहोचल्यावर खेळाडू अतिशय निवांत असे दिसत होते.
यानंतर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट घेतली, ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. संघाला 6 डिसेंबर 2024 पासून ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे.
दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण करताना दिसत आहे. पाढरं टी-शर्टवर रोहित दिसत आहे. त्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा पीएम अल्बानीज यांना भारतीय संघाची ओळख करून देत आहे. पीएम अल्बानीज यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने या बैठकीचे फोटो शेअर केले आहेत.
पर्थ कसोटीत टीम इंडियाने मारली बाजी
पर्थमधील पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला आणि धावांच्या फरकाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वात मोठा विजय मिळवला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. विराटने ऑस्ट्रेलियन भूमीवर 30वे कसोटी शतक आणि सातवे शतक झळकावले. या सामन्यात आठ विकेट घेणारा कार्यकारी कर्णधार बुमराहची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ 238 धावांवर गारद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 104 धावांत गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 46 धावांची आघाडी होती. भारताने दुसरा डाव 6 गड्यांच्या मोबदल्यात 487 धावांवर घोषित केला होता आणि 533 धावांची आघाडी मिळवली होती.
भारतीय संघ 28 नोव्हेंबरला सकाळी पर्थहून कॅनबेराला पोहोचला. आता 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर संघासोबत नसेल. तो भारतात परतला आहे. दिवस-रात्र दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी दोन दिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पिंक कुकाबुराचा बॉलचा वापरण्यात येणार आहे. पंतप्रधान इलेव्हनचे नेतृत्व अष्टपैलू जॅक एडवर्ड्स करणार आहे.
ऑस्ट्रेलियन संसदेतील भाषण करताना रोहित म्हणाला की, खेळ असो किंवा व्यापार भारत-ऑस्ट्रेलिया दोन्ही देशातील संबंध खूपच चांगले आहेत. फार वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही ऑस्ट्रेलियात येऊन खेळत आहोत. इथं खेळणं नेहमीच आव्हानात्मक असते. कारण इथं क्रिकेटचा सर्वोच्च आनंद घेणारे लोक आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्समधील स्पर्धात्मक भावना आहे, असे तो म्हणाला. आम्ही मागच्या आठवड्यात जे यश मिळवलं ते कायम टिकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरु. क्रिकेटच्या मैदानातून भारतीयांसह ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आनंद द्विगुणीत करु, असेही रोहित म्हणाला आहे.
रोहित आणि गिलला मिळणार संधी?
रोहित शर्मा आणि शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतात. त्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या आहेत. सामना जिंकूनही टीम इंडियाला प्लेइंग-11 मध्ये बदल करावे लागतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये गंभीरसोबत बसलेला दिसला. रोहित सोमवारी नेटमध्ये पिंक बॉलने सराव करताना दिसला आणि ॲडलेडमधील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी तो त्याच्या कौशल्यावर काम करताना दिसला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 28-11-2024