◼️ वीर सावरकरांची खोली १०० वर्षे जतन करुन ठेवणाऱ्या दामले कुटुंबीयांचे केले कौतुक
रत्नागिरी : शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी वीर सावरकर शिरगाव येथे राहात असलेल्या दामले यांच्या घराला भेट दिली. अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरीत राजकीय बंदीवान म्हणून आणण्यात आले; परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव, गायवाडी येथील टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णूपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले.
आपल्या घरातील धान्याचे कोठार रिकामे करून सावरकरांना तिथे ठेवले. २७ नोव्हेंबर १९२४ ला सावरकर शिरगावात वास्तव्यास आले आणि या ऐतिहासिक घटनेला उद्या (ता. २७) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. दामले यांच्या घरातील ही खोली आणि सावरकरांची लेखणी, दिवा, हस्ताक्षराची प्रत आजही जतन करून ठेवली आहे. दामले कुटुंबाची भेट घेत सामंत यांनी वीर सावरकर यांच्या या ठिकाणच्या वास्तव्याबाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या. वीर सावरकरांची खोली १०० वर्षे जतन करुन ठेवणाऱ्या दामले कुटुंबाचे उदय सामंत यांनी कौतुक केले. याच खोलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार व वीर सावरकरांची २९ मार्च १९२५ ला भेट झाली होती. त्यानंतरच संघाची स्थापना झाली. याच घरामध्ये सावरकरांनी उःषाप या नाटकाच्या लेखनाला सुरवात केली आणि हिंदू पदपातशाही हा ग्रंथ लिहिला. येथे मुंबईच्या सावरकर दर्शन प्रतिष्ठान व श्री पतितपावन मंदिराने लावलेल्या फलकाचे अनावरण ६ मार्च २००६ ला संघाचे विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले.
वीर सावरकर २७ नोव्हेंबर ते जून १९२५ पर्यंत शिरगावात वास्तव्याला होते. या कालावधीत त्यांनी सर्व हिंदूंची मोट बांधली. सावरकरांच्या विनंतीवरून हिंदू धर्मातील सर्व महिलांचे हळदीकुंकू झाले. बाबा शिरगावकर यांच्या घरी सत्यनारायण पूजेसाठीही सावरकर हे लहान मुलांना घेऊन गेले होते. मराठी शाळेत सवर्ण व अस्पृश्यांची मुलांना बसण्यास वेगळी व्यवस्था होती; परंतु सावरकरांच्या विनंतीनंतर सर्व मुले एकत्र बसू लागली, असे शैला दामले यांनी सांगितले. दरम्याम, सावरकर यांना घरी वास्तव्यास आणणारे (कै.) रामचंद्र विष्णू दामले हे शिरगाव हिंदू महासभेचे कार्यवाह होते. (कै.) मोरेश्वर विष्णू दामले हे स्वातंत्र्यवीरांचे लेखनिक होते. नारायण विष्णू दामले यांनी हैद्राबाद सत्याग्रहात भाग घेतला. गजानन विष्णू दामले हे स्वातंत्र्यवीरांचे स्वीय सहाय्यक होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 30-11-2024