“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी“
मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले आत्मक्लेश उपोषण मागे घेतले आहे. ईव्हीएमधील घोळासह राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशांच्या प्रचंड वापराबाबत बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन सुरु केलं होतं.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पाणी घेत बाबा आढाव यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राक्षसी बहुमत मिळाल्यानतंर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? असा सवाल करत महायुतीच्या नेत्यांवर बोचरी टीका केली. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
महात्मा फुले वाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव यांनी गुरुवारपासून आत्मक्लेश उपोषण सुरू केले होते. त्यानंतर शनिवारी शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील या नेत्यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण मागे घेतलं. विधानसभा निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर करण्यात आल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन राज्यभर न्यावे, अशी अपेक्षा बाबा आढाव यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं कोणाला वाटत असेल, तर वणवा पेटवायला एक ठिणकी कारणीभूत असते आणि ती ठिणगी आज पडलेली आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
आता सत्तामेव जयते सुरु – उद्धव ठाकरे
“जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हारलेले सुद्धा इथे येतोय. थोडक्यात या निकालावर ना हारलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे. जिंकले त्यांना धक्का आहे की आम्ही जिंकलो कसे आणि आम्ही हारलो आम्हाला धक्का बसला आहे की आम्ही हरलो कसे. याच कारण स्पष्ट आहे. जे आमच्याकडून वधवून घेतलं, सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालं आहे आणि त्याच्याविरोधात आपण उभे राहिलो आहोत,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“पैशांचा अमाप वापर झाला हे माझ्याही कानावर आलं. सर्वांनी विनोद तावडेंचा तो व्हिडिओही बघितला. योजनांचा पडणारा पाऊस पाहिला. थोडक्यात या सरकारने काय केलं आहे, की योजनांचा ऍनेस्थेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. महत्त्वाचा मुद्दा एक नाहीये, असे अनेक मुद्दे आहेत. त्यापैकी एक ईव्हीएमचा मुद्दा आहे आणि म्हणूनच मी उल्लेख केला, की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येतात. याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आम्ही एकमेकांविरोधात लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागली. आता विधानसभेची मुदत संपूनही राष्ट्रपती राजवट का लागली नाही. या सर्व प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. एवढं बहुमत मिळाल्यावरसुद्धा लोक राजभवनात जाण्यऐवजी शेतात का जातात? अमावस्येचा मुहुर्त का घेतात? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळात कोण येणार? याबाबत काहीच तयारी नव्हती. सर्व वाटपाबाबत आता वेळ लागतोय. राक्षसी बहुमत मिळाल्यानतंर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? त्यांनी राजभवनात जायला पाहिजे,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:42 30-11-2024