रत्नागिरी : लोकसभेनंतर काँग्रेसकडून राज्यात आक्रमकपणे मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली असून काँग्रेसची रणनीती ठरविण्यासाठी आणि इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी काँग्रेस प्रभारी यांनी रत्नागिरीत आले होते. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. रत्नागिरीची जागा काँग्रेसला हवी, अशी मागणी कोकण प्रभारी बी. संदीप यांच्याकडे केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली.
काँग्रेसभवन येथे कोकण प्रभारी बी. संदीप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सेल आणि प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांना त्यांनी कानमंत्र दिला. आगामी निवडणुकीत काँग्रेसची रणनीती यावेळी ठरविण्यात आली. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसच्या इच्छुकांची मते प्रभारींनी जाणून घेतली. एकूणच पक्षाची जिल्ह्यातील राजकीय स्थिती काय, पक्ष वाढीसाठी काय करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अधिक माहिती देताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. लाड म्हणाले की, कोकणचे प्रभारी आले त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत जाणून घेतले. पाच विधानसभा संदर्भात माहिती घेतली. पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याचा लेखाजोखा मांडणारा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर महायुती म्हणून पक्षाची योग्य भूमिका ठरेल, असे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 27/Sep/2024