राजापूर : जुवे बेटावर कांदळवन उद्यान निर्मितीचा प्रस्ताव

राजापूर : चारही बाजूंनी निळाशार पाण्याने वेढलेल्या आणि होडी वगळता दळणवळणाचे कोणतेही साधने नसलेल्या जुवे गावाने बेट म्हणून आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कांदळवनांचे संरक्षण, संवर्धन करण्याच्यादृष्टीने कांदळवन कक्षातर्फे जुवे येथे कांदळवन उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कांदळवन कक्ष विभागातर्फे देण्यात आली.

ब्रिटिशकाळामध्ये निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजापूरच्या बंदरामध्ये ज्या खाडीतून जहाजे येत होती. त्या जैतापूरच्या खाडीमध्ये विलीन होणाऱ्या अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट वसलेले आहे, येथील पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास न होता निसर्ग पर्यटनाचा विकास, स्थानिक लोकांच्या संस्कृतीचे जतन व रोजगाराला चालना देणे, कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन करणे या उद्देशाने या ठिकाणी कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून वनविभागातर्फे आणि त्यानंतर आता कांदळवन कक्षातर्फे प्रयत्न सुरू आहेत. कांदळवन उद्यान निर्मितीच्या माध्यमातून जलदेवतेने जणू कवेत घेतलेले जुवे बेट पर्यटनदृष्टया भविष्यामध्ये जगाच्या नकाशावर येणे आता दृष्टिक्षेपात दिसत आहे.

प्रस्तावित कांदळवन उद्यान निर्मिती
जुवे येथील प्रस्तावित असलेला कांदळवन उद्यान निर्मिती प्रकल्प सुमारे १०.६० हेक्टर क्षेत्रामध्ये उभारण्यात येणार आहे. कांदळवन उद्यानाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती अंतर्गत खेकडापालन, कोळंबी पालन, विविध रंगीत माशांचे उत्पादन करणे या बाबींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचवेळी या उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र, कांदळवन म्युझियम, तरंगते रस्ते, जेटी, निरीक्षण मनोरे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

राजापुरातील जुवे येथे उभारण्यात येणाऱ्या कांदळवन उद्यान निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. येत्या तीन-चार महिन्यांमध्ये प्रशासकीय परवानग्यांची पूर्तता होऊन कांदळवन उद्यान निर्मितीच्या प्रस्ताव मंजुरीला चालना मिळेल. प्रस्ताव मंजुरीसह प्रत्यक्षात कांदळवन उद्यान निर्मिती होण्याच्यादृष्टीने कांदळवन कक्ष विभाग सध्या प्रयत्नशील आहे. – किरण ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष विभाग, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 27/Sep/2024