रत्नागिरी : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम २०१२ पासूनच सुरू असून, ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा महामार्ग रखडला आहे. त्याला एकच सरकार जबाबदार नाही. मात्र, येत्या डिसेंबरपर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
यापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग हा ‘बीओटी’ तत्त्वावर बांधला जाणार होता. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर या महामार्गासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, ठेकेदारांच्या पळपुटेपणामुळे हा मार्ग रखडला आहे. केंद्र व राज्य शासनातील मंत्र्यांनीही या मार्गाबाबत अनेकदा खंत व्यक्त केली आहे. आपल्यालाही हा महामार्ग लवकर व्हावा, असे वाटते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी चिपळूणमध्ये महामार्ग व कामाबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु, पवारसाहेब यांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरवली गेली असावी, अशी शंकाही ना. सामंत यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुका महायुती एकत्रच लढणार…
महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्याशी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांचे ‘बाँडिग’ चांगले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही आमदार हे महायुतीचे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभेचा उत्साह अन् शरद पवारांच्या कानपिचक्या…
लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेतेमंडळींचा उत्साह फारच वाढला आहे. उत्साही नेते मंडळींना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागली असून, त्याच आविर्भार्वात ते वावरत आहेत. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांचे कान टोचले आहेत, ज्यांच्या सर्वाधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री, असेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभेत महायुतीचीच सत्ता… विधानसभेत पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच, लोकसभेला शिवसेनेचा स्ट्राईक रेट राज्यात सर्वांत जास्त आहे आणि एकनाथ शिंदेंचे नेतृत्व महायुतीने स्वीकारले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 27/Sep/2024