राजापूर : कमी कालावधीचे आणि हळव्या जातीचे काही भागातील भात पीक कापणीयोग्य झाले आहे. मात्र, डुकरांसारख्या रानटी जनावरांच्या शेतावर चालणाऱ्या ‘रात्रीच्या खेळा’ने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर टाकली आहे. रात्री शेतामध्ये घुसून रानडुकरासारखे प्राणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे भातशेतीचा हातातोंडाशी आलेला घास तर, हिरावून घेतला जाणार नाही ना? अशी चिता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातून, रानटी जनावरांचा शेतातील उपद्रव नेमका रोखायचा कसा? भातशेतीचे त्यांच्यापासून संरक्षण करायचे कसे? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
भातलावणी झाल्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे भातशेतीवर करपा आणि निळे भुंगेऱ्याचा चांगलाच प्रादुर्भाव झाला. त्यातून, अनेक भागातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाताची रोपे सुकून गेल्याने वा किडीने फस्त केल्याने होणाऱ्या संभाव्य नुकसानीने शेतकरी आधीच चिंताग्रस्त झाले आहेत. किडीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या संभाव्य नुकसानीचे ओझे डोक्यावर असूनही यावर्षी भातशेती चांगली झालेली असल्याने समाधानकारक उत्पादन मिळण्याच्या आशेने शेतकरी सुखावला आहे. जास्त कालावधीच्या भातशेतीला लोंब्या तयार होऊन लागल्या आहेत. तर, कमी कालावधीच्या आणि हळव्या जातीची भातशेती काही भागातील कापणीयोग्य झाली आहे. मात्र, या भातशेतीचे रानटी जनावरांकडून मोठ्याप्रमाणात नुकसान केले जात आहे. रात्रीच्यावेळी झुंडीने येणारी ही रानटी जनावरे शेतात धुडगूस घालून नुकसान करीत आहे. त्यांच्या शेतामधील रात्रीच्या धुमाकुळाने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.
भातशेतीची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर रात्रीची जागरणेही सुरू झाली आहेत. मात्र, राखण करणाऱ्या शेतकऱ्यांचा डोळा चुकवून रानटी जनावरे रात्रीच्यावेळी डुक्कर शेतामध्ये घुसत आहेत. या रानटी जनावरांना रोखायचे कसे? शेतीचे संरक्षण नेमके करायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
भातशेतीमध्ये रात्रीच्यावेळा रानटी जनावरे घुसून नुकसान करीत आहेत. त्यांना रोखायचे कसे? या नुकसानीची भरपाई करायची कशी? शासनाने याची त्वरित दखल घ्यावी. – अनिल शिंदे, शेतकरी
शेतकऱ्यांकडून विविध क्लुप्ती
रानटी जनावरांच्या उपद्रवापासून भातशेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतामध्ये बुजगावणी उभी करणे, रात्रीचे शेताच्या बांधावर कंदील वा विजेचे बल्ब रात्रभर प्रकाशित ठेवणे, वाऱ्यासोबत आवाज येणाऱ्या कैसेटच्या रील ताणून ठेवणे यांसारख्या विविध क्लुप्त्या केल्या जात आहेत. काही भागामध्ये त्या यशस्वी ठरत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 27/Sep/2024