◼️ वर्षभर सब स्टेशन अधिकाऱ्याविना, कामगारांच्या हाती कारभार
रत्नागिरी :
मागील आठवडाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या विजेच्या लपंडवाने हैराण झालेल्या बसणी पंचक्रोशीतील ग्रामस्थानी शनिवारी पहाटे साडेतीन वाजता खरवते येथील सब स्टेशनवर चाल केली. आक्रमक झालेले ग्रामस्थ या ठिकाणी धडकल्यावर अनेक धक्कादायक बाब समोर आल्या. मागील अनेक महिने या सब स्टेशनचा कारभारच कर्मचाऱ्यांच्या हाती असून वारंवार अनेक तास गायब होणाऱ्या विजेच्या कारणांबाबत उत्तर देण्यासाठी सक्षम अधिकारीच उपस्थित नसल्याने यापुढे वीज गेल्यास ग्रामीण पोलिस स्थानकासह महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन देण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थानी दिला.
महावितरणची पावसाला पूर्वीची डागडुजीची कामे सुरू असली तरी बसणी पंचक्रोशीतील कोतवडे, बसणी, सडये, आरे, काळबादेवी, साखरकर, कासारवेली आदी गावांमध्ये मागील महिन्यांपासून वारंवार वीज गायब होण्याची समस्या सुरू आहे. अधिकाधिक रात्री वीज गायब होण्याचे प्रकार वाढल्याने या भागातील ग्रामस्थांना फार त्रास सहन करावा लागत आहे. वाढलेल्या उकाड्यात रात्रीच्या वेळी वीज गेल्याने या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. सातत्याने गायब होणाऱ्या विजेच्या समस्येबाबत या भागातील ग्रामस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन देखील दिले मात्र या आश्वासनाची अंमलबजावणी होत नसल्याने या पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत.
पाऊस नसताना देखील मागील दोन दिवस बसणी पंचक्रोशीतील भागात रात्रीच्या वेळी लाईट जाण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत येथील ग्रामस्थानी महावितरण अधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे देखील तक्रार केली. शुक्रवारी रात्री पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी लाईट लाईट उशिरा पर्यंत न आल्याने उकाड्याने हैराण झालेले ग्रामस्थ शनिवारी पहाटे साडेतीन वाजता महावितरणच्या खरवते येथील सब स्टेशनवर धडकले. आक्रमक ग्रामस्थ ज्यावेळी सब स्टेशनवर धडकले त्यावेळी या कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. सातत्याने लाईट जाण्याचे कारण काय?, वीज पुरवठा सुरळीत करण्यात इतके तास लागण्याचे कारण काय?, रात्रीच्या वेळेतच वीज गायब का होते अशा प्रश्नांची सरबत्ती आक्रमक झालेल्या ग्रामस्थानी उपस्थित कर्मचाऱ्यांना केली. ग्रामस्थांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर कर्मचारी देऊ शकले नाहीत. यावेळी चंदन बसणकर, सुमित राणे, ओंकार शिर्के, अमित मांडवकर ऋषीं मांडवकर विजय भोसले, विनोद मयेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खरवते सब स्टेशनला कायम स्वरुपी अधिकारी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 30-05-2026














