दापोलीतील जागेला येणार सोन्याचा दर

दापोली : दापोली तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा या प्रस्तावित ग्रीनफिल्ड प्रकल्पावर आता दलालांचा डोळा आहे. अजून हा मार्ग प्रस्तावित आहे. प्रत्यक्ष जमीन अधिग्रहण होण्यास सुरुवात झाल्यास या जमिनींना सोन्याचा दर येणार आहे. मात्र याबाबत शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती नसल्याने जमीन विक्री दलाल जमिनी विका, म्हणून शेतकऱ्यांना गळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

प्रवास लवकर व्हावा म्हणून आगामी काळात मुंबई ते गोवा ग्रीनफिल्ड मार्ग होणार आहे. हा मार्ग गावागावांतून जाणार आहे. याबाबत सर्वेक्षण आणि रस्त्यांना मार्किंग देखील झाले आहे. त्यामुळे अनेक गावांना याचा फायदा होणार आहे. यामुळे जमिनीला देखील चांगला दर येणार आहे. यातून गावागावातील अनेक कुटुंब समृद्ध होतील, असे दिसत आहे. त्यामुळे अशा मोक्याच्या जागा हातातून जाऊ नये म्हणून दलाल हातात नकाशे घेऊन नवीन होणाऱ्या मार्गा लगत कोण कोण शेतकरी आहेत.

यांची कुंडली काढून अशा शेतकऱ्यांना जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून त्या जागा बळकावू पाहत आहेत. खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीत याचाबत लोकांना माहिती देणे आवश्यक होते. मात्र तसे होत नाही. दलालांनी या ग्रीन फिल्ड रस्त्याची माहिती मिळताच अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी अन्य लोकांना विकल्या आहेत. याबाबत आता स्थानिक शेतकऱ्यांनी जागरूक होणे आवश्यक आहे.

दापोली पर्यटन तालुका जितक्या झपाट्याने विकला जातोय, त्या जमीन विक्री व्यवहरातून दलाल मात्र आर्थिकदृष्ट्‌या गब्बर झालेले दिसत आहे. जमीन विक्री व्यवहारातून दलालांनी कोट्यवधींची माया जमवली आहे. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या जागा, या जागेची थेट विक्री न करता पत्नीच्या नावावर, मित्रांच्या नावावर विकत घेऊन अशा जागांची कोट्यवधी रुपयांना विक्री होत आहे.

त्यामुळे रोजचे लाखोंचे खरेदी विक्रीचे व्यवहार दापोलीत होत असून यामुळे शासकीय कार्यालयात दलालांची ‘वट’ वाढलेला दिसत आहे. जमीन खरेदी विक्री व्यवहाराची, शासकीय कार्यालयातील दलालांची कामे झटपट होताना दिसत असून सामान्य माणसाला मात्र अनेकदा ताटकळत रहावे लागते.

व्यवसायासाठी जागाच शिल्लक नाही
शासन बंदिस्त शेळी पालन, दुग्धजन्य व्यवसाय, शेती याचे वर भर देत आहे. मात्र असे व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांकडे जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. हे वास्तव समोर येत आहे. गावागावात जमीन दलालांची फौज तयार झाली असून हे दलाल गाव नकाशे घेऊन बसले आहेत, अशा वेळी एखाद्या शेतकऱ्यांचा कागदोपत्री जमिनीचा वाद निर्माण झाला तर शेतकऱ्याला झुकतं माप मिळत नाही. त्यामुळे अनेक वर्षे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेवटी कंटाळून शेतकरी जागा अल्प दारात विकत आहेत. तर दलाल मालामाल होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 13/Dec/2024