पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलले; पुणे पोलिसांकडून सिया गोयलसह प्रियकर गजाआड
पुणे: Ketan Agarwal Death प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर फोटो काढत असताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या केतन अग्रवालचा प्रत्यक्षात खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा संपूर्ण कट त्याच्याच होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचून घडवून आणला होता. पुणे पोलिसांनी या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या थरारक हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा आणि व्यावसायिक क्षेत्र हादरले आहे.
वाढदिवसाच्या ट्रेक दरम्यान रचला मृत्यूचा सापळा
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा विवाह नोव्हेंबर महिन्यात सिया गोयल हिच्याशी होणार होता. गुरुवार, १८ जून रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन तिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विवाहाची आणि नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत केतन किल्ल्यावर पोहोचला, मात्र तिथे त्याच्यासाठी आधीच मृत्यूचा सापळा तयार होता.
सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्समुळे बिंग फुटले
घटनेच्या दिवशी सियाने पोलिसांना सांगितले होते की, कड्यावर फोटोसाठी पोज देत असताना अचानक केतनचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला होता. मात्र, लोणावळा पोलिसांना सियाच्या जबाबात विसंगती आढळली. पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात हुडी घातलेला, हेडफोन लावलेला आणि चेहरा झाकलेला एक संशयित तरुण आढळून आला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, तो संशयित तरुण सियाचा प्रियकर असल्याचे समोर आले. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सिया आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
१७ कोटींचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ठरणार होते
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह अत्यंत शाही पद्धतीने राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. या भव्य ‘डेस्टिनेशन वेडिंग’साठी दोन्ही कुटुंबांनी जयपूरमध्ये तब्बल १७ कोटी रुपयांचा एक पॅलेस बुक केला होता, तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खाजगी विमानांची व्यवस्थाही करण्यात आली होती. लग्नकार्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच हा भयंकर प्रकार घडल्याने दोन्ही कुटुंबे प्रचंड धक्क्यात आहेत. या कटामध्ये आरोपींना आणखी कोणी मदत केली होती का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 24-06-2026














