नवी दिल्लीतील गणतंत्र मंडपात दिमाखदार सोहळा; देशभरातील ६५ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नागरी सन्मान
नवी दिल्ली: Padma Awards 2026 चे अत्यंत दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे वितरण करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील अतुलनीय आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या भव्य राष्ट्रीय समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. पद्म पुरस्कार वितरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील एकूण ६५ मान्यवरांना (२ पद्मविभूषण, ७ पद्मभूषण आणि ५६ पद्मश्री) पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अलका याज्ञिक यांना ‘पद्मभूषण’; संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव
महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या पुरस्कारांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अद्भूत योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी १६ हून अधिक भाषांमध्ये २ हजारांपेक्षा जास्त गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या या सुरेल प्रवासाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.
‘हिटमॅन’ रोहित शर्मासह महाराष्ट्रातील ६ दिग्गजांना ‘पद्मश्री’
क्रीडा, कला, संगीत, चित्रपट, वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे कला क्षेत्रातून प्रसिद्ध अभिनेते आर. माधवन यांना ‘थ्री इडियट्स’ सारख्या चित्रपटांतील अभिनय आणि ‘रॉकेट्री’ चित्रपटाच्या सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी गौरवण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातून भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला; त्यांनी १९८९ मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली ‘मानवी दूध बँक’ सुरू केली होती.
वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे ८९ वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना लोकसंगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला, ते १० फुटी तारपा वाद्य वाजवण्यात कुशल आहेत. उद्योग क्षेत्रातून माझगाव डॉकमधून सुरुवात करत १९९२ मध्ये ‘दास ऑफशोअर’ कंपनीची स्थापना करणारे उद्योगपती अशोक खाडे यांना गौरविण्यात आले. तर चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवर ४ दशकांहून अधिक काळ योगदान देणारे अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री प्रदान करण्यात आला, त्यांचा पुरस्कार बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.
यंदाच्या पद्म पुरस्कारांचे संपूर्ण गणित
यंदा केंद्र सरकारने देशात एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. या संपूर्ण यादीचे वर्गीकरण ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री असे आहे. एकूण पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा समावेश असून, देशातील १६ दिवंगत मान्यवरांना मरणोत्तर हा सन्मान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील या सातही सुपुत्रांनी आणि सुकन्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या अथांग कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 24-06-2026














