रत्नागिरी जिल्हा सारस्वत ब्राह्मण २९ सप्टेंबर रोजी स्नेहसंमेलन

रत्नागिरी : सारस्वत हितवर्धक मंडळ, मुंबई या सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या मंडळाच्या शताब्दी (१९२४ ते २०२४) वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा सारस्वत ब्राह्मण समाजाचे स्नेहसंमेलन येत्या रविवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे स्नेहसंमेलन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ मराठा भवन हॉलमध्ये होणार आहे. सारस्वत हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सीए सिद्धार्थ सिनकर यांच्या अध्यक्षतेखाली ते होईल.

या स्नेहसंमेलनाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर प्रमुख पाहुणे म्हणून आणि सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक सीए सुनील सौदागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सारस्वत स्नेहवर्धक मंडळाच्या रत्नागिरी आणि लांजा शाखेच्या सहकार्याने स्नेहसंमेलन होणार आहे.

यावेळी नंदकुमार केळकर बुवा (भालावली) यांचा ‘भक्तिरंग’ हा भजनाचा कार्यक्रम होईल. ‘कृषीरंग’ हा फळ प्रक्रिया उद्योग-विपणन आणि भविष्य अनुभव कथन व मार्गदर्शन प्रसिद्ध उद्योजक अमर देसाई यांचे असेल. त्यानंतर सौ. मुग्धा भट-सामंत आणि वाद्यवृंदाचा ‘भावरंग’ हा अभंग, नाट्यगीते आणि भावगीतांचा कार्यक्रम होईल.

स्नेहसंमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सारस्वत ब्राह्मण समाजातील व्यक्तींनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्नेहसंमेलनाविषयी अधिक माहितीसाठी उत्पल वाकडे (7767809192) यांच्याशी संपर्क साधावा, असे सारस्वत स्नेहवर्धक मंडळाचे रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:57 PM 27/Sep/2024