चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेतील नागरी सुविधा व शहर विकासाच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाच्या विविध विभागांतील प्रमुखांच्या बदल्या झाल्या असून, हे विभागप्रमुख बदलीच्या ठिकाणी गेल्याने न.प. तील महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आता ठेकेदारांच्या हातात आल्याने नगरपालिका आता ठेकेदारच चालविणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेत आता केवळ मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी अशा तीन महत्त्वाच्या पदांवर अधिकारी कार्यरत राहिले आहेत.
चिपळूण न.प.तील नागरी सेवा सुविधांसह धोरणात्मक निर्णय व विकासकामांसंदर्भात खात्यातील प्रमुखांच्या असलेल्या बदल्या झाल्या आहेत. संबंधित खात्यांतील विभागप्रमुखांना नुकतेच न.प.तून कार्यमुक्त करण्यात आले आहे. कार्यालय अधीक्षक अनंत मोरे यांची गुहागर येथे बदली झाली आहे. बांधकाम विभागाचे नगर अभियंता खताल यांची सोलापूर, तर पाणीपुरवठा व विद्युत विभागाचे प्रमुख नागेश पेठे यांची वाई, संगणक विभागाच्या कांबळे यांची खेड न.प.त बदली झाली आहे. संबंधित विभागात आता जवाबदार अधिकारी नसल्याने या महत्त्वाच्या विभागांचे कामकाज कसे चालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. न.प.त गेली काही वर्षे अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. न.प.त आस्थापनासह काही विभागांत कायमस्वरूपी व अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. परिणामी, गेली काही वर्षे अशा विभागातून ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी घेऊन कामकाज चालविले जात आहे.
‘त्या’ अभियंत्याचा अहवाल नाही
नगरपरिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदारामार्फत सेवातत्त्वावर अभियंता म्हणून गेली दहा वर्षे एकच व्यक्ती कामकाज करीत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी न.प. प्रशासनाकडून अहवाल मागविला. मात्र, त्याचा अहवाल प्रशासनाने दिला नसून दहा वर्षे ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या अभियंत्यास त्या विभागातून हलविले नसल्याची खंत व्यक्त करून ठेकेदाराचे साटेलोटे कुठपर्यंत आहे, असा संतप्त सवालदेखील मुकादम यांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 28/Sep/2024