लांजात मोकाट जनावरांचा उपद्रव

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात गेले महिनाभर मोकाट जनावरांचा वावर त्रासदायक ठरत आहे. गुरांच्या उपद्रवामुळे व्यापारी, नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांतून होत आहे. गणेशोत्सव काळातही नागरिकांना गुरांचा त्रास सहन करावा लागला. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनचालकांना, व्यापारी, प्रवासी व स्थानिक रहिवासी यांना शहरातील मोकाट गुरांचा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर दिवसा व रात्री-अपरात्री ही गुरे महामार्गाच्या मध्यभागी अचानक आडवी येत असल्याने वाहनचालक, प्रवाशांसमोर संकट उभे राहते आहे. त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. शेतीची कामे आटोक्यात आल्याने या पाळीव गुरांना शेतकरी मोकाट सोडून देत आहेत. त्यामुळे अन्नासाठी गुरे बाजारपेठेत मोकाट फिरताना दिसत आहेत. या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी लांजा नगरपंचयातीने दोन वर्षांपूर्वी ठोस पावले उचलली होती. मोकाट गुरांना पकडून मालकांकडून नगरपंचायतीने दंड वसूल केला होता. त्यानंतर यावर्षीही मोठ्या प्रमाणात गुरे मोकाट दिसू लागली आहेत. बैल, गाई, वासरे मोकाट कळपाने बाजारात, महामार्गावर फिरत आहेत.

शहरात कोर्ले फाटा, बाजारपूल, नगरपंचायत परिसर, पेट्रोल पंप, बसस्थानक, साटवली फाटा, लांजा हायस्कूल, कुक्कुटपालन याठिकाणी उनाड गुरे महार्गावर कळपाने दिसून येत आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होऊन परिणामी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 28/Sep/2024