खेड : बहिरवली येथील आगीत भक्ष्यस्थानी पडलेले घर पुन्हा उभारले

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहिरवली नं. १ मोहल्ला येथील बशिरा कासिम चौगुले यांचे घर आगीत पूर्णतः भस्मसात झाले होते. त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. दुबईस्थित उद्योजक व उधळे गावचे सुपुत्र बशिर हजवानी यांनी स्वखर्चाने सर्व सोयीसुविधांनीयुक्त अद्ययावत घराची उभारणी करून देत चौगुले यांचा संसार पुन्हा उभा करून दिला.

गृहप्रवेशावेळी चौगुले कुटुंबीयांनी हजवानी यांचे आभार मानले. बहिरवली नं. १ मोहल्ला येथील रहिवासी बशिरा कासिम चौगुले यांच्या पतीचे निधन झाले आहे. २७ मार्चला रात्री चौगुले यांच्या घराला आग लागली. त्यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे सिलिंडर स्फोटाने काही क्षणातच त्यांच्या घराचे होत्याचे नव्हते झाले होते. या भीषण दुर्घटनेनंतर चौगुले कुटुंबीय नातेवाइ‌कांकडे आश्रयाला होते. आधीच घरची हालाखीची परिस्थिती त्यात भीषण आगीने घरही भस्मसात झाल्याने चौगुले कुटुंबीयांवर डोंगर कोसळला होता. या भीषण दुर्घटनेची माहिती दुबईस्थित उद्योजक हजवानी यांना समजली. त्यांनी सामाजिक बांधिलकीमधून चौगुले कुटुंबीयांना सर्वसोयींनीयुक्त घर उभे करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्यक्षात घराचे कामही सुरू केले. बशिर हजवानी यांच्या उपस्थितीत चौगुले यांच्या कुटुंबीयांचा नूतन घराच्या वास्तूचा गृहप्रवेश सोहळा नुकताच झाला.

हजवानींचे कौतुक
बहिरवलीतील चौगुले यांच्या घराला आग लागली. त्यांचा संसार उघड्यावर पडला. जवानी यांनी सामाजिक बांधिलकी जपत हे घर बांधून दिले. त्यांच्या दातृत्वाचे भागात कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 28/Sep/2024