भातगावची प्रणाली सुवरे पोलिस दलात रुजू

गुहागर : तालुक्यातील भातगाव सुवरेवाडी येथील प्रणाठी सुवरे ही पोलिस दलात पोलिस शिपाई पदावर रुजू झाली आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने ही भरारी घेतली. प्रणाली सुवरे हिच्या कुटुंबात कोणीच सरकारी सेवेत नाही किंवा कोणीही पोलिस खात्यामध्ये नाही. तिने पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. दत्तात्रय कीर यांचे तिला मार्गदर्शन मिळाले.

प्रणालीचे आई-वडील हे दोन्ही शेती करतात. कौटुंबिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी प्रणालीला शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. शेतीबरोबरच मोलमजुरी करून कौटुंबिक व शैक्षणिक खर्च भागवत होते. २१व्या वर्षी ती महाराष्ट्र राज्य पोलिस दल सेवेत रुजू झाली आहे. संपूर्ण भातगावातून कुणबी समाजाची पहिली महिला पोलिस बनण्याचा मान तिने एवढ्या कमी वयातच मिळविला आहे. ती सध्या रत्नागिरीत एस.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत आहे. प्रणालीला लहानपणापासूनच मैदानी खेळ खेळण्याची प्रचंड आवड होती. कबड्डी हा तिचा आवडता खेळ. तिने कबड्डी खेळात सोमेश्वर प्रतिष्ठान संघातून खेळण्यास सुरवात केली. महाराष्ट्र राज्य निवड चाचणीत प्रणाली सहभागी झाली होती. त्यानंतर पोलिस भरती प्रशिक्षणाला सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली असल्याने तिने एक वर्ष शिक्षण थांबविले व पोलिस भरतीचे प्रशिक्षण चालू केले. पहिले काही महिने तिने स्वतःच मेहनत केली. त्यानंतर तिने शिवरत्न अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. पोलिस भरतीच्या पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले: पण, त्या अपयशाने ती खचली नाही. पुढे पोलिस भरतीची परीक्षा पास झाली. तिची रत्नागिरी जिल्हा पोलिस विभागात शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आई-वडील आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे चांगले पाठबळ मिळाले. विशेष भरतीसाठीचे प्रशिक्षण शिवरत्न अॅकॅडमीत मिळाले. भविष्यात पदवी परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस दलातील विविध उच्चपदावर जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रणाली सुवरे, गुहागर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 28/Sep/2024