रत्नागिरी : जिल्ह्यातील ३७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा निर्णय नुकताच आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. ही कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांची जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर दोन दिवसात करण्यात आली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष परशुराम निवेंडकर यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे दोन दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या रखडलेल्या पदोन्नतीबाबत चर्चा झाली. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि होणारी पदोन्नती याचा समतोल राखला जाऊन दोन दिवसात पदोन्नतीचे पत्र दिले जाईल, असे आश्वासन डॉ. आठल्ये यांनी संघटनेला दिले होते. त्याप्रमाणे आरोग्यसेवकांमधून आरोग्य सहाय्यकपदी ११ कर्मचाऱ्यांचे तर आरोग्यसेविकांमधून आरोग्य सहाय्यिका पदी २६ कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली. तसे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आश्वासन डॉ. आठल्ये यांनी तातडीने पूर्ण केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष निवेंडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. आठल्ये यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:50 28-09-2024