खेडमध्ये गो-वंश हत्येचे रॅकेट ?

खेड : तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदीपात्रात रविवारी 22 रोजी गो-वंशाचे अवशेष आढळल्यानंतर हे कृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. त्यातच सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देवणे पूल येथील नदीपात्रात पुन्हा एकदा गो-वंशाचे अवशेष आढळून आले. चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी या प्रकरणातील तीनजणांना अटक करण्यात आल्याचे तसेच त्यांच्याकडून मांस व एक जिवंत बैल हस्तगत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांनी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. राजमाने यांनी यावेळी केले.

खेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश हत्या होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी दुपारी खेड शहरानजीकच्या नारिंगी नदीवरील देवणे पुलाखाली गोवंशाची हत्या करून त्याचे अवशेष छिन्नविच्छिन्न अवस्थेत टाकलेले काही नागरिकांना दिसले. हा संतापजनक प्रकार कानोकानी पसरून घटनास्थळी गर्दी जमली होती. यावेळी घटनास्थळी जमलेला जमाव संतप्त झालेला असतानाच रस्त्यावरून एका रिक्षामधून प्रवास करणार्‍या प्रवाशाने जमावाला उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे प्रशोभक झालेल्या जमावाने ती रिक्षा अडवली. परंतु त्या रिक्षामध्ये त्या प्रवाशांसोबत दोन लहान मुले असल्याने पोलिसांनी मध्यस्थीं केल्याने अडवलेली ही रिक्षा जमावाने सोडून दिली. परंतु तरीही जमावाने रिक्षाची मागील बाजूची काच फोडून टाकली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले होते. मात्र, रविवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी शहरातून रूट मार्च करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, सोमवारी दि.23 रोजी सकाळी 10 च्या सुमारास आणखी गोवंशाचे अवयव देवणे पूल परिसरातील नारिंगी नदी पात्रात आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी पुन्हा लोक जमा झाले होते. संतप्त जमावाकडून कोणतीही आगळीक होऊ नये, म्हणून पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी जादा पोलिस कुमक मागवली होती. दरम्यान, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील खेडमध्ये भेट दिली आहे. या प्रकरणी सायंकाळी खेडचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेच्या संदर्भात माहिती दिली.

यावेळी श्री राजमाने म्हणाले, खेडमध्ये शशिकांत दांडेकर या शेतकर्‍याची गाय चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र त्यांनी तिचा शोध घेतला असता नारिंगी नदी किनारी देवणे भागात त्यांना गोवंशाचे अवशेष आढळले. त्यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून चार तपास पथके नेमले होते. पोलिसांना 24 तासांतच गोवंश चोरी करणारा एकजण, त्याची वाहतूक करणारा एकजण व त्याची कत्तल करणारा एक संशयित सापडला आहे. त्या पैकी एकाच्या घरी खेड शहरातच दहा किलो मांस देखील सापडले असून शहर जवळील गावात चोरी करून लपवून ठेवलेला एक बैल देखील हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस कोणालाही सोडणार नाहीत. कठोर कारवाई केली जाईल. परंतु नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 24-12-2024