महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज : न्या. डॉ. अनिता नेवसे

रत्नागिरी : पोषण आहाराबरोबरच महिलांना कायदेविषयक जागरूकतेची गरज आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.

चिपळूण तालु‌का विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय-१ आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनायांच्या संयुक्त विद्यमाने कळंबस्ते ग्रामपंचायत येथे कायदेविषयक व राष्ट्रीय पोषण आहारविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, दिवसेंदिवस महिलांच्या वाढत्या समस्या व प्रगल्भ कायदे यामुळे प्रत्येक महिलेने तिच्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेविषयक अधिकारांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे. भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळण्याचे अधिकार प्राप्त होतात. राज्य घटनेच्या आर्टिकल १४ अनुसार सर्व नागरिकांना समान संधी दिली आहे. तसेच घटनेच्या आर्टिकल ३९ अनुसार समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायेदविषयक सहाय्य देण्याची जबाबदारी शासनाची आहे. न्यायालयीन पक्रियेमध्ये न्याय मागण्यासाठी सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे, जेणेकरून समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासून वंचित राहणार नाही हे या कायदेविषयक कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. नेवसे म्हणाल्या.

शासनाच्या विविध महिलांविषयक योजना तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे अॕसिड हल्ल्याच्या पीडितांबाबत योजना २०१६, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक योजना २०१६ व बालकांविषयीच्या मोफत शैक्षणिक योजना याबाबत माहिती दिली.

यावेळी महिलांनी आकर्षक रांगोळया तसेच पाककला प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

एकात्मिक बालविकास योजनेच्या अधिकारी श्रीमती सावंत, महिला संरक्षण अधिकारी श्रीमती जाधव यांनी राष्ट्रीय पोषण आहार प्रकल्पस्तरीय कार्यक्रमाबाबत उपस्थित महिलांना पोषण आहाराचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमात कळंबस्ते ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकांनी वृक्षारोपण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व मान्यवरांना सोनचाफ्याचे रोप देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाला विविध भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन सरपंच, उपसरपंच कळंबस्ते तसेच तालुका विधी सेवा समिती, चिपळूणचे कर्मचारी श्रीमती कासार व श्री. कोतवडेकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 28-09-2024