चिपळूण : पालिकेने लागू केलेल्या घरपट्टीबाबत नागरिकांचा आक्षेप आल्यानंतर फेरसर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पालिकेने लागू केलेल्या घरपट्टीबाबत काही सूचना असल्यास २८ डिसेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत पालिकेने दिली आहे. त्यानुसार पालिकेत तक्रारींचा पाऊस पडला आहे. आतापर्यंत ९०० मालमत्ताधारकांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पालिकेने त्यातील दीडशे लोकांच्या मालमत्तेची तपासणी केली. त्यात अर्ध्या म्हणजे ७५ लोकांच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे. निम्म्या लोकांनी केलेल्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य आढळले नाही. दोन वर्षांपूर्वी पालिकेने एका एजन्सीच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ३१ हजार ७७३ मालमत्तांपैकी १८ हजार ८६४ मालमत्तांना नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम, झोनबदल, यापूर्वी मालमत्ता कर यादीत नावे नसणे, भाड्याने देणे या कारणास्तव करात वाढ झाली आहे. यातील अनेकांना ही वाढ मान्य असली तरी काहीजण राजकीय आसरा घेऊन त्या विरोधात रणकंदन माजवत आहेत. ज्या मालमत्ताधारकांना शंका आहेत, त्यांनी २८ डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवावेत, त्यांच्या मालमत्तांचे फेरसर्वेक्षण करू, असे पालिकेने जाहीर केले आहे.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षाचे नेते पालिकेवर मोर्चे आणत आहेत. त्याची दखल घेऊन पालिकेने आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सुरुवात केली. त्यासाठी मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. ज्या ७५ मालमत्ताधारकांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळले आहे, त्यात काही तांत्रिक बाबींचा समावेश आहे. नगरपालिका त्यांच्यासाठी सुनावणी लावणार आहे. सुनावणीनंतर मालमत्ताधारकांच्या शंकांचे निरसन केले जाईल. त्यातून एक तर घरपट्टी कमी होईल किंवा जास्त होईल. लागू केलेली घरपट्टी योग्य आहे हे पालिकेने स्पष्ट करून दिले तर त्यात कोणताही बदल होणार नाही.
ज्या मालमत्ताधारकांना त्यांच्या घरपट्टीबाबत तक्रारी आहेत, त्यांना हरकत घेण्याची सूचना आम्ही केली आहे. शंका असेल किंवा खरंच काही चुकीचे झाले असेल तर हरकत घ्या. शेजारच्या मालमत्ताधारकाने अर्ज केला म्हणून आपण करायचा आणि त्यातून काहीही तथ्य निघणार नसेल तर पालिकेचा उगाचच वेळ वाया जाणार आहे. याची नोंद घेऊन मालमत्ताधारकांनी अर्ज करावे. सतीश दंडवते, उपमुख्याधिकारी, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 24/Dec/2024












