रत्नागिरी : शालेय सहलींसाठी पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अभ्यासपूर्ण सहलीचे नियोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
दिवाळीनंतर शाळांमध्ये स्नेहसंमेलने व सहलींचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांत सहलींमध्ये गैरप्रकार, दुर्घटना असे प्रकार घडू लागल्याने शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली तयार केली आहे. त्याच्या काटेकोर पालनाची हमी मुख्याध्यापकांनी द्यायची आहे. त्या शिवाय विद्यार्थी सहलीला येणार असेल, तर त्याच्या पालकाचे लेखी संमतीपत्र घ्यावे लागणार आहे.
नियम व अटींचा भंग झाल्यास मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. नद्या, नाले, उंच पर्वत आदी धोकादायक ठिकाणी शाळांसाठी सहलींना मज्जाव शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.
सहलीसाठी फक्त एसटी महामंडळाच्या गाड्या घ्याव्यात, असेही आदेश आहेत. प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य आहे. रात्रीचा प्रवास टाळावा लागणार आहे. सहलींसाठी ठिकाणे निवडताना ती अभ्यासपूर्ण असतील, याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळे किल्ले, ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये, भौगोलिक महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 25/Dec/2024














