चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तळसरच्या जंगलात पट्टेरी वाघाचे ठसे सापडल्यानंतर वनविभाग आता अॅक्टीव्ह मोडवर आला आहे. या पट्टेरी वाघाची छबी मिळविण्यासाठी आता जंगलामध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विविध ठिकाणी सात ते दहा कॅमेरे बसवण्यात आले असून त्यानंतरच जिल्ह्यात पट्टेरी वाघाच्या संचारावर शिक्कामोर्तब होणार आहे.
अनेकवेळा जिल्ह्यात ठिकठिकाणी पट्टेरी वाघ दिसल्याच्या बातम्या येत असतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचे दर्शन झाल्याचे सांगणारे कोणीही पुढे येत नाही. मात्र चिपळूण तालुक्यातील तळसर येथील जंगलात पट्टेरी वाघाचे ठसे आढळून आल्याने या प्राण्याचा जिल्ह्यात संचार असल्याच्या बातम्यांना आता दुजोरा मिळत आहे. वास्तविक रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगत कोयना येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एस.टी.आर./टी१ हा वाघ खाली उतरून तळसर व चिपळूण परिसरातील जंगलात संचार करीत असावा अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा वावर आहे. या भागात फिरणाऱ्या दोन म्हशीदेखील या वाघाने मारल्या आहेत. त्यामुळे येथे पट्टेरी वाघाचा संचार असावा या बाबत वन विभागाला आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष कॅमेऱ्यातील शूटिंगद्वारेच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे वन विभागाला याची प्रतीक्षा आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक अधिकारी, वनपाल व कर्मचारी त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा पट्टेरी वाघ दिसला तर येथील वनसंपदा समृद्ध आहे असे म्हटले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 26/Dec/2024












